सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीत 8 रेल्वे स्थानकांना आयएसओ मानांकन प्राप्त झालं आहे. एनएबीसीबी मान्यता प्राप्त बोर्डाद्वारे या स्थानकांचे लेखापरीक्षण करण्यात आले होते. त्यानुसार सोलापूर विभागातील अहमदनगर, दौंड, कोपरगाव, लातूर, कलबूर्गी, शिर्डी, वाडी आणि कुर्डूवाडी या रेल्वे स्थानकांचा यात समावेश आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याआधी सोलापूर रेल्वे स्थानकाला आयएसओ मानकांन देण्यात आले आहे. त्यामुळे सोलापूर विभागातील एकूण आठ रेल्वे स्थानकं आता मानाकंन प्राप्त करणारी झाली आहेत. सप्टेंबर 2019 मध्ये सोलापूर रेल्वे स्थानकास आयएसओ 14001 मानांकम प्रदान करण्यात आले होते. त्यानंतर विभागातील इतर रेल्वे स्थानकात देखील राष्ट्रीय हरित लवादाच्या मार्गदर्शक तत्वानुसार महत्वपूर्ण बदल करण्यात आले.
ज्यात स्थानकाच्या छतावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करणे, प्लॅटफॉर्मवरील कव्हर शेडवर सौरउजेचे पॅनल बसवणे, प्लॅस्टिकमुक्त स्थानक बनवणे, यांत्रिकिकृत साफसफाईचा वापर करणे, कचऱ्याचे नियोजन, वॉटर आणि उर्जा ऑडिट, ध्वनिप्रदूषण इत्यादी बाबींचा समावेश होता. दोन वेळेस आयएसओ कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या रेल्वे स्थानकांचे निरीक्षण केले. त्यानंतर हे प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य मंडळ प्रंबधक प्रदीप हिरडे यांनी दिली.
हे प्रमाणपत्र तीन वर्षांसाठी वैध असणार आहे. या काळात आयएसओ 14001 च्या मानकाचे पालन या रेल्वे स्थानकांना करावे लागणार आहे. नियमित अंतराने प्रमाणित संस्था स्थानकांचे लेखापरीक्षण करतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे प्रमाणपत्र सोलापूर विभागाला ऑनलाईन पाठवण्यात आले असून लवकरच त्याची प्रत पोस्टाने प्राप्त होणार असल्याची माहिती देखील प्रदीप हिरडे यांनी दिली.