मुंबई : सुरुवातीला चीनमधून जगभरात पसरणाऱ्या कोरोना संसर्गाने मार्च पासून भारतात देखील थैमान घातला आहे. नागरिक स्वतःची काळजी घेत आता दैनंदिन कामास सुरुवात करत असतानाच कोरोनाचा धोका मात्र अजूनही कायम आहे. मार्चपासून केंद्रातर्फे या रोगाबाबत योग्य ती खबरदारी घेण्यासाठी तसेच वेळेत उपचार घेऊन नागरिकांमध्ये भेदभाव न करावा याबाबत जनजागृती करण्यात येत होती. दूरसंचार विभागाने देखील दूरसंचार कंपन्यांना या रोगाबाबत जनजागृती करण्यासाठी संदेश देणारी कॉलरट्यून ठेवण्याचे आदेश दिले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट, ‘टेलिग्राम’ वरही उपलब्ध
आता या कॉलरट्यूनला नागरिक देखील कंटाळले असून अनेकदा महत्वाच्या कामासाठी फोन करताना सुरुवातीचे सेकंद हा संदेश एकवण्यातच वेळ वाया जातो. त्यामुळे कॉल लावण्यास विलंब होतो, तर अनेकदा रिंग न वाजताच कॉल लागतो. त्यामुळे नागरिकांमध्ये काहीसा गोंधळ निर्माण होत असून आता जनजागृती पुरे! असे म्हणत ही कॉलरट्यून बंद करण्याची मागणी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.
बाळा नांदगावकर यांनी, “कोरोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाने गेली अनेक महिने कॉलर ट्यून म्हणून कोरोना ची माहिती देण्यात येत आहे. परंतु आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे व या कॉलर ट्यून मुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असलेतरी विलंब होतो अथवा लागत नाही, त्यामुळे जी काही जनजागृती करायची ती विविध माध्यमातून जाहिरातीद्वारे होतच आहे. त्यामुळे आता ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी.” असे ट्विट करत ही मागणी केली आहे.