मुंबई : सध्याचा कोरोनाचा काळ बघता शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असे सुरू करता येईल का, याबाबत राज्य शासन केंद्राशी विचारविनिमय करणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तशा सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत. केंद्राच्या नवीन शैक्षणिक धोरणाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती नेमण्याचे आदेशही त्यांनी दिले. शैक्षणिक धोरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली. बैठकीला मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सध्याच्या स्थितीत काहीही झाले तरी १०० टक्के विद्यार्थ्यांपर्यंत आॅनलाईन, आॅफलाईन व जसे शक्य होईल तसे शिक्षण मिळालेच पाहिजे. शिक्षण विभागाने यातील सर्व उणिवा, अडथळे दूर करावेत, शिक्षकांची उपस्थिती तपासावी. विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात काय अडचणी येत आहेत त्या तत्काळ पाहाव्यात, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.
येत्या आॅक्टोबरमध्ये या बाबत आढावा घेण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बैठकीत सांगितले. भविष्यात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तरी प्रत्यक्ष शाळा काही प्रमाणात सुरु करता येतील का यावरही बैठकीत चर्चा झाली.