मोहोळ : मोहोळ तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असून मोहोळ शहरालगत असणाऱ्या घागरे वस्तीवर आज शनिवारी दुपारी वस्ती समोरच्या शेळीवर हल्ला केला. ही घटना चार वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे लोक भयभीत झाले आहेत.
13 आगस्ट रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास गुरव यांच्या शेतात प्रथम बिबट्या दृष्टीस पडला होता. त्यानंतर स्टेशन रोडच्या बाजूच्या शेतकऱ्यानी बिबट्याला पाहिले. त्यानंतर भोयरे, खरकटने असा सीना नदीकाठाच्या झाडाझुडपातून प्रवास करत शेळी, कुत्रा, शिगरू यावर हल्ला करत शनिवारी दुपारी घागरे वस्तीवर आला. मोहन घागरे यांच्या वस्ती समोर असलेल्या शेळी वर हल्ला करून शेळीचे पोटच फोडले.
शेळीच्या ओरडण्याने कुत्र्याचे लक्ष गेले व कुत्री भुकू लागल्याने शेतकरी सावध झाले. मोहन घागरे, अतुल घागरे भगवान घागरे रामचंद्र घागरे, गोविंद घागरे यांनी प्रत्यक्ष आरडाओरड केल्यानंतर बिबट्या उसात पळून गेला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यानंतर बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी शेतकरी फटाके उडवू लागले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मोहोळ तालुक्यातील भोयरे परिसरात सलग दोन दिवस बिबट्या आढळला असून शुक्रवारी एका शेतकऱ्याच्या शेळी सह कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तर शनिवारी भरदिवसा एका शेळीवर हल्ला करुन जखमी केले. तरीदेखील वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी कोणतीच उपाययोजना केली जात नसल्याने या परिसरातील नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. आत तर पुन्हा बिबट्या मोहोळ शहरालगतच घागरे वस्तीवर असून शिवसेनेचे काकासाहेब देशमुख, मनसेचे शाहुराजे देशमुख , अजित भोसले यांनी घटनास्थळाला भेट देवून शेतकऱ्यांची विचारपूस करून सावध व जागृत राहण्याचे आवाहन केले आहे.
* जिवावर बेतण्याची शक्यता
बिबट्याने आतापर्यत चार प्राण्यावर हल्ला केल्याचे उघड झाले आहे. बिबट्याचा वावर एखाद्याच्या जिवावर बेतण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे वनविभागाने पाहणी करण्याचे ढोंग न करता बिबट्याला पकडण्याचे उपाय योजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.