पुणे : कोरोनाची परिस्थिती पाहता मुंबईनंतर आता पुण्यातही जम्बो कोव्हिड सेंटर उभारण्यात आले आहे. पुण्यातील पहिल्या जम्बो हॉस्पिटलचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, महापौर मुरलीधर मोहोळ यासह अन्य लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
सामाजिक जागृती आणखी प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहचवण्याची गरज आहे. हॉस्पिटलमधील सुविधा अशाच पडून राहू नयेत, असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले. जगातील अनेक ठिकाणांचा आढाव्यानुसार कोरोनाची एक लाट संपल्यानंतर दुसरी लाट येते. त्यामुळे आपण गाफील राहून चालणार नाही. पुढचा टप्पा खूप महत्वाचा आहे. डिसेंबरमध्ये कोरोनाची लस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजून चार महिने आपल्याला असेच काढावे लागणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यांनी भाषणादरम्यान या रुग्णालयाबाबत माहिती दिली. “पुण्यातील या जम्बो रुग्णालयात 600 ऑक्सिजन बेड्स आणि 200 आयसीयू बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. हे रुग्णालय 19 दिवसात उभं करण्यात आलं आहे. मंगळवारी संध्याकाळपासून हे रुग्णालय सुरु केले जाईल,” असे अजित पवार भाषणादरम्यान म्हणाले.
खाजगी रुग्णालयाकडून आलेली बिलं कमी केली आहेत. गणराया कोरोनाच्या लढाईत यश देईल. पुणेकरांची प्रतिकारशक्ती वाढल्याचं सिरो सर्वेमधून समोर आलं आहे. डिसेंबरमध्ये लस येणार अस केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं, ती लवकर यावी,” असेही अजित पवार यावेळी म्हणाले.