अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील खैराट येथील एक मुस्लीम धर्मीय मुलगा गेल्या दहा वर्षापासून घरात गणपती बसवत आहेत. विविधत पूजा अर्चा करून विधिवत मिरवणूक काढून विसर्जन करतोय. सध्याच्या कोरोनात मर्यादा आल्या आहेत. हिंदु – मुस्लिम मानवतेचा, समानतेचा आदर्श सर्वासमोर ठेवला आहे. या मुलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जहिर हुसेन बिराजदार (रा.खैराट, ता. अक्कलकोट )असे या मुलाचे नांव आहे. तो इयत्ता आठवीत शिकत आहे. बालवाडीत असल्यापासून वयाच्या चौथ्या वर्षापासून जहीरला बाप्पाचे आकर्षण आहे. तेव्हापासून सलग दहा वर्षे झाले तो विधिवत गणेश मूर्तीची स्थापना करतो. सकाळ – संध्याकाळ कुटुंबासमवेत आरती करतो. या गणेश पूजनच्या वेळी त्याचे शेजारचे मित्रमंडळीही हजेरी लावतात.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या लहान मुलाचे आदर्श घेऊन आपण एकमेकांचे सण उत्सव साजरे करणे हीच खरी भारतीय संस्कृती आहे व ही संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ आहे, अशी प्रतिक्रिया त्याचे वडील हुसेन बिराजदार यांनी व्यक्त केली. आम्ही कुंटुंबीयही याला सहकार्य करतो, असे सांगितले. मुलाचे आजी आजोबा स्वतः सर्वधर्मसमभाव मानणारे आहेत. तेही जहीरच्या गणेशोत्सवात सामील होत असतात. बिराजदार कुंटुंबीय सगळेच या उत्सवात सहभागी होतात.
जहीरचे दोन मोठे बंधूसह चुलत बहीण भाऊही या गणेश उत्सवात सहभागी होतात. जहिर नित्यनिमाने नमाज पठणासाठी मशिदीतही जातो. इतरही सर्व सण उत्सवात तो उत्साहाने सहभागी होतो. जहीरचे आजी – आजोबा स्वतः श्रीशैलमा जाऊन आले आहेत. अशा या सर्वधर्मभावाची शिकवण देणा-या या कुंटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे.