सोलापूर : अनुराधा नक्षत्रावर आज मंगळवारी दुपारी 1.59 नंतर गौरी आवाहन करता येईल, असे पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी सांगितले आहे. ज्येष्ठा नक्षत्र, मध्यान्ही असलेल्या दिवशी गौरींचे पूजन करतात.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उद्या बुधवारी नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे. मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन करण्यात येते. गुरुवारी (ता. 27) दुपारी 12:37 नंतर गौरी विसर्जन करता येईल. काही वेळेस गौरी आवाहन किंवा विसर्जनासाठी ठराविक वेळेची मर्यादा नसते. पण यावर्षी आवाहन व विसर्जनासाठी मर्यादा दिलेली असून, त्या मर्यादेत कधीही आवाहन व विसर्जन करता येईल, असेही ते म्हणाले.
भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन करून ज्येष्ठा नक्षत्राचे दिवशी गौरी पूजन केले जाते आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते. काही प्रांतात सप्तमीचे दिवशी आवाहन, अष्टमीला गौरी पूजन करून नवमीला विसर्जन केले जाते.
शाडूचे किंवा पितळी असे देवीचे दोन मुखवटे उभे करून किंवा सुगड आणि तांब्यावर ठेवून पूजन केले जाते. काही जणांकडे 5 खडे वाटीत ठेवून पूजन केले जाते. यामध्ये श्रावण मासातील शुक्रवारी काही जणांकडे महालक्ष्मी स्थापना केली जाते ती लक्ष्मी व भाद्रपदात अनुराधा नक्षत्रावर आणलेली गौरी अशा ज्येष्ठा आणि कनिष्ठा म्हणून दोन देवींची पूजा केली जाते. गौरी विसर्जनाची मर्यादा काही वेळेस सकाळी लवकर असते अशा वेळेस मंत्रांनी जागेवर गौरीविसर्जन करून घ्यावे आणि नंतर संध्याकाळी प्रथेप्रमाणे आवरून ठेवावे किंवा जलाशयात विसर्जन करावे.