मुंबई : राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह 11 नेत्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. दोषारोपपत्राची प्रत शिवडी न्यायालयातून घेऊन जाण्यासाठी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी 31 ऑगस्ट रोजी कामकाजाच्या वेळी या सर्वांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे, कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे, शिवसेनेचे मुंबईतील नेते सचिन अहिर यांच्यासह 11 जणांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राष्ट्रवादीच्या या नेत्यांनी 2018 मध्ये पोलिसांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मरीन ड्राईव्ह पोलिसांनी या सर्वांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. या सगळ्यांनी मंत्रालयासमोर तत्कालीन सरकारविरोधात आंदोलन केलं होतं. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणार आहेत.
दरम्यान, सध्याच्या सरकारमधील वजनदार नेत्यांनाच पोलिसांची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तत्कालीन सरकारविरोधातच आंदोलन केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली असली तरीही राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना न्यायालयात उपस्थित राहावं लागणार आहे.