नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत मास्क न वापरता प्रवास करणारे बेजबाबदार नागरिक त्यांच्यासह सर्वांनाच धोका निर्माण करीत आहेत. त्यांच्याबाबत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने आता कडक भूमिका घेतली आहे. विमामास्क प्रवास करणा-याचे नाव ‘नो फ्लाय लिस्ट’ घालण्याचा निर्णय घेतला आहे.
‘नो फ्लाय लिस्ट’ म्हणजे विमान प्रवाशांची ब्लॅक लिस्ट असते. यात गुन्हेगार, तस्कर आदींची नावे असतात. त्यांना कोणत्याही विमान कंपनीच्या विमानातून प्रवास करता येत नाही. अशा व्यक्तींची नावे सर्व विमान कंपन्यांना देण्यात येतात. यातील कोणी अनवधानाने विमानात घुसल्याचे यंत्रणांना आढळले तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विमान कंपनीवर असते.
नागरी हवाई वाहतूक प्राधिकरणाने (डीजीसीए) विमान प्रवासादरम्यान मास्क न वापरणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. विमान प्रवासाबाबत डीजीसीएने सुधारित नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार, विमान प्रवासात मास्क न वापरणारे आणि कोविड-19 बाबतच्या आरोग्यविषयक उपाययोजनांचे पालन न करणाऱ्या प्रवाशांवर विमान प्रवासासाठी संपूर्ण बंदी घालण्यात येईल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नियम धुडकावणाऱ्या प्रवाशांची नावे ‘नो फ्लाय लिस्ट’मध्ये टाकण्यात येणार आहेत. या प्रवाशांची नावे त्या विमानातील कर्मचारी ठरवतील. एखाद्या प्रवाशाने वैद्यकीय कारणांमुळे प्रवासात सतत मास्क वापरणे शक्य नसल्याची कारण दिल्यास त्याला इतर प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेऊन तशी परवानगी दिली जाऊ शकते.
* प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय
डीजीसीएने प्रवाशांना दिलासा देणारा निर्णयही घेतले आहेत. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना खाण्यापिण्याचे पदार्थ व जेवण देण्यावरील बंदीही उठविली आहे. विमान कंपन्या आता विमानांमध्ये प्रवाशांना खाण्यापिण्याचे पदार्थ पूर्वीसारखे देऊ शकतील. विमान कंपन्या त्यांच्या त्यांच्या धोरणानुसार जेवण, स्नॅक्स व चहा-कॉफी-इतर पेये प्रवाशांना देऊ शकतील. यासाठी फेरवापर न होणाऱ्या नष्ट करता येणाऱ्या थाळ्या, पेले, चमचे, बाटल्या व कप देण्याचे बंधन आले आहे.