मोहोळ : बंद असलेल्या मोहोळ शहरातील एका हॉटेलच्या किचनमध्ये एका इसमाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. हा धक्कादायक प्रकार आज रविवारी उघडकीस आल्याने संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली. ही हत्या की आत्महत्या अशी चर्चा मोहोळ शहरात दिवसभर सुरू होती
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मोहोळ शहरातील कन्या प्रशाला चौकात सोलापूर पुणे महामार्ग लगत ‘रुची’ नावाचे हॉटेल आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या पाच महिन्यांपासून हे हॉटेल बंद आहे. या हॉटेलचे मूळमालक पाटील यांनी हे हॉटेल पंढरपूर येथील एका व्यवसायीकाला चालविण्यासाठी दिलेले आहे. सदर हॉटेल मध्ये तीन परप्रांतीय मजूर काम करत होते. त्यापैकी दोन कामगार आपल्या मायदेशी परत गेले होते. एक कामगार ई-पास न मिळाल्याने या हॉटेलातच राहत होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज रविवारी या हॉटेलातून दुर्गंधी येत होती. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी ही माहिती मोहोळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता हॉटेलच्या किचनमध्ये एका इसमाचा सडलेला मृतदेह फरशीवर पडलेल्या अवस्थेत आढळून आला. सदर मृतदेहाच्या बाजूलाच असलेल्या लोखंडी अँगलला एक पडदा बांधून सदर इसमाने गळफास घेतल्याचे प्राथमिक दृष्टया समोर आले.
पडद्याला मृतदेहाच्या गळ्याचे हाड चिकटलेले आढळले. मृतदेहाचे शीर धडापासून वेगळे झाले होते. यावेळी पोलिसांनी रितसर पंचनामा करुन तपासणी केली असता, सापडलेल्या कागदपत्रांवरुन सदरचा मृतदेह कुलदिपसिंग सोलसिंग मरावी (रा. मध्यप्रदेश) या मजूराचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.
या प्रकरणी मोहोळ पोलिसांत अकस्मात मृत्यूचे नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बजरंग बाडीवाले हे करीत आहेत.
* लॉकडाऊनमुळेच आत्महत्या केल्याचा अंदाज
हॉटेल कामगाराने आत्महत्या केल्याची घटना दोन महिन्यानंतर उघडकीस आली आहे. कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गावी जाता येत नसल्याने आणि खाण्यापिण्याची सोय झाली नसल्याने बंद असलेल्या हॉटेलच्या किचनमध्ये कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मागील दोन-अडीच महिन्यापासून मृतदेह लटकत राहिल्याने आपोआप त्याचे मुंडके गळुन बाजूला पडल्याचे दिसून आले.