सोलापूर / पंढरपूर : राज्यातील धार्मिकस्थळं सुरू करण्याच्या मागणीसाठी उद्या सोमवारी एक लाख भाविकांसह पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मोर्चा निघणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे येणारी सर्व एसटी सेवा बंद करण्यात आली असून एसटी सेवा बंद करण्याचे आदेशच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.
आदोलकांची मोठी संख्या जिल्ह्याभरात येणार असल्याचा अंदाज असल्याने पंढरपूरकडे येणारी एसटी वाहतूक सेवा बंद करण्याचा प्रस्ताव पोलिसांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आला होता, तो त्यांनी स्वीकारला आहे. त्यानुसार एसटीसेवा बंद राहणार आहे. राज्यातील धार्मिकस्थळं सुरू करण्यासाठी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली उद्या पंढरपुरात विठ्ठल मंदिर प्रवेशाचं आंदोलन करण्यात येणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जिल्हाधिकाऱ्याने पंढरपूरमध्ये येणाऱ्या सर्व एसटी सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच विठ्ठल मंदिर परिसरात दहा फूट उंचीचे लोखंडी बॅरेकेटिंग लावण्यात आले आहेत. कुणीही मंदिरात प्रवेश करू नये म्हणून हे बॅरिकेटिंग लावण्यात आले आहेत. तसेच मंदिर परिसरासह संपूर्ण पंढरपुरात पोलिसांचा प्रचंड ताफा तैनात करण्यात आला आहे.
पंढरपुरात करण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्तावर वंचित बहुजन आघाडीने सडकून टीका केली आहे. कितीही रेलिंग किंवा बॅरिकेटिंग करा आम्ही विठ्ठल मंदिरात प्रवेश करणारच असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे आणि प्रदेशाध्यक्ष अशोक सोनावणे यांनी दिला आहे.
सरकारने वंचितच्या आंदोलनाचा धसका घेतला आहे. हे आंदोलन दडपण्याचा प्रकार सुरू आहे. त्यासाठी पंढरपुरात रेलिंग लावण्यात आले असून एसटी सेवाही बंद करण्यात आली आहे. प्रशासनाने एसटी सेवा बंद केली तरी आम्ही पंढरपुरात घुसूच. आम्हाल कोणीही रोखू शकत नाही, असं सांगतानाच पंढरपुरातील व्यापाऱ्यांनीही आपल्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून तेही या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे उद्या सोमवारी होणाऱ्या वंचितच्या आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
* जवळपास 500 ते 600 पोलिसांचा फौजफाटा
पंढरपुरात वंचित बहुजन आघाडी आणि विश्व वारकरी सेनेच्या नेतृत्वात होणाऱ्या आंदोलनाची संभाव्य गर्दी पाहता पोलिसांमार्फत खबरदारी घेतली जात आहे. पंढरपूरच्या सर्व सीमा आणि विठ्ठल मंदीर परिसरात मोठा फौजफाटा पोलिसांमार्फत तैनात करण्यात आला आहे. मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर लोखंडी बॅरेकेडिंग लावण्यात आले आहेत. उद्या रात्रीपर्यंत जवळपास 500 ते 600 पोलिसांचा फौजफाटा पंढरपुरात तैनात असणार आहे.