नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी (वय 84) यांचं आज दीर्घ आजाराने आज निधन झालं आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांच्यावर 10 ऑगस्ट रोजी मेंदूवर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. काही दिवस ते व्हेंटिलेटरवरच होते. त्यातच त्यांची आज सोमवारी दुपारी प्राणज्योत मालवली.
10 ऑगस्ट रोजी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ट्विट करुन त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितलं होतं. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होतं की, ‘दुसऱ्या कारणासाठी रुग्णालयात गेलो होतो. यावेळी मला कोरोनाची लागण झाली असल्याचं आढळलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोना आणि वाढत्या वयामुळं त्यांना 10 ऑगस्ट रोजी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आपला कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करून सांगितलं होतं आणि संपर्कात आलेल्यांना टेस्ट करून घेवून आयसोलेट होण्याबाबत देखील त्यांनी आवाहन केलं होतं. 10 ऑगस्टच्या रात्री त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना व्हेंटिलेटर सपोर्ट देण्यात आला होता. शस्त्रक्रिया यशस्वी झाली मात्र व्हेंटिलेटर सपोर्ट कायम ठेवावा लागला होता. 11 ऑगस्ट रोजी हॉस्पीटलनं मुखर्जी यांची प्रकृती क्रिटिकल असल्याचं सांगत ते व्हेंटिलेटरवर असल्याचं स्पष्ट केलं होतं.
प्रणव मुखर्जी हे दीर्घ कोमात गेल्याचं नंतर हॉस्पीटलनं सांगितलं. तेव्हापासून मुखर्जी यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. अखेर आज 31 ऑगस्ट (सोमवार) त्यांचं निधन झालं आहे. काँग्रेसचे दिग्गज नेता म्हणून राजकीय प्रवास करणारे प्रणव मुखर्जी हे 2012 ते 2017 दरम्यान देशाचे राष्ट्रपती होते. सन 2019 मध्ये त्यांना केंद्र सरकारनं भारत रत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देवून सन्मानित केलं होतं.
* ‘सुराज्य’ परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली
* भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्याविषयी थोडक्यात
प्रणव मुखर्जी यांचा जन्म 11 डिसेंबर 1935 रोजी झाला. 1969 मध्ये त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना मुखर्जी यांना राज्यसभेचे खासदारकीचं तिकीट देण्यात आलं. ते राज्यसभेवर खासदार म्हणून निवडले गेले. सन 1973 मध्ये मुखर्जी यांचा केंद्र सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश झाला. सन 1982 ते 1984 दरम्यान ते भारताचे अर्थमंत्री होते. सन 1980 ते 1985 दरम्यान ते राज्यसभेतील लिडर ऑफ हाऊस होते. राजीव गांधी यांच्या नेतृत्वाच्या वेळी मुखर्जी यांना थोडेसे बाजूला सारण्यात आले. त्यावेळी मुखर्जी यांनी स्वतःचा राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला. मात्र, नंतर 1989 मध्ये त्यांनी पुन्हा तो पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. दरम्यान, राजीव गांधी यांच्यानंतर पी.व्ही. नरसिंह राव हे पंतप्रधान झाले. 1991 मध्ये त्यावेळी मुखर्जी यांची नियुक्ती नियोजन आयोगाच्या प्रमुखपदी करण्यात आली.
सन 1995 मध्ये मुखर्जी यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. 2004 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ते पहिल्यांदाच (लोकसभेवर) निवडून आले. त्यावेळी युपीए सत्तेत आलं होतं. त्यानंतर संरक्षण (2004 ते 2006), परराष्ट्र (2006 ते 2009) आणि अर्थ (2009 ते 2012) मंत्रालयाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. ते मंत्रीगटाचे प्रमुख देखील होते. जुलै 2012 मध्ये प्रणव मुखर्जी यांनी पी.ए. संगमा यांचा पराभव करत राष्ट्रपती पदाची निवडणूक मोठया फरकाच्या मतांनी जिंकली. 5 दशक राजकीय प्रवास केल्यानंतर ते भारताचे 13 वे राष्ट्रपती बनले. 2012 ते 2017 दरम्यान ते भारताचे राष्ट्रपती होते. सन 2019 मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच ‘भारतरत्न’ देवून गौरविण्यात आले होते.