सांगली : इस्लामपूर शहर व परिसरातील कोव्हिड आणि नॉन कोव्हिड रुग्णांचे हाल होण्याचे प्रकार वाढतच चालले आहेत. शासनाने वाळवा तालुक्यातील काही खासगी रुग्णालये ताब्यात घेतल्याचे जाहीर करूनही अद्याप त्या ठिकाणी पुरेशी व्यवस्था करण्यात अडचणी निर्माण होताना दिसत आहेत. अशातच इस्लामपुरात आदेश डावलणा-या डॉक्टरावर गुन्हा दाखल झाला आहे.
काही खासगी डॉक्टर प्रशासनाला दाद देत नसल्याचे पुढे आले आहे तर काही ठिकाणी प्रशासनाने थेट डॉक्टरांवर कारवाईची भूमिका घेतली आहे. रुग्णांचे व त्यांच्या कुटुंबियांचे मात्र हाल होत आहेत. या प्रकाराने गेल्या दोन दिवसात तीन ते चार रुग्णांचा नाहक बळी गेल्याची चर्चा आहे. गेल्या आठवड्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यात रुग्णांचा काही दोष नसतानाही त्यांना आपले जीव गमवावे लागले आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची ससेहोलपट झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याबाबत जिल्हाभरात संताप व्यक्त होत असताना वाळवा तालुक्यातील प्रशासनाने चार दिवसांपूर्वी धाडसी निर्णय घेत काही खासगी रुग्णालये अधिग्रहित केली होती, मात्र अधिग्रहण आणि प्रत्यक्ष उपचार सुरू करण्याच्या प्रक्रियेत मात्र डॉक्टर आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील गैरमेळाचा प्रकार पुढे आला आहे. यातच बस स्थानकाच्या जवळील नामांकित असलेले आधार हॉस्पिटल चर्चेत आले आहे. प्रशासनाने आज सकाळी त्यांना नोटीस बजावून सायंकाळी त्या हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश वाठारकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कोरोना उपचार सुरू करण्यात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका त्यात ठेवला आहे.
जिल्हाधिकारी यांनी आधार हॉस्पिटलमध्ये कोव्हिड सेंटर सुरू करण्याचे आदेश देऊनही त्याला प्रतिसाद न दिल्याने डॉ. योगेश वाठारकर यांच्यावर आज इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक नरसिंह रामराव देशमुख यांनी इस्लामपूर पोलिसात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, ‘जिल्हाधिकाऱ्यांच्या 28 ऑगस्ट च्या आदेशानुसार कोरोना रुग्णांच्यावरील उपचारासाठी डॉ. वाठारकर यांचे आधार हॉस्पिटल अधिग्रहित करण्यात आले आहे, परंतु डॉ. वाठारकर यांनी त्यांना पुरेसा वेळ व सूचना देऊनही कोरोना साथीच्या रोगाच्या अनुषंगाने शासकीय आदेशाची पूर्तता केली नाही.