मुंबई : मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती दिल्याने संतप्त भावना येत असताना राज्यात मेगा पोलीस भरतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र या पोलीस भरतीत मराठा समाजाच्या तरुणांना आरक्षणाचा फायदा होणार नसल्याने अनेक मराठा नेत्यांनी भरती करु नये, अशी आग्रही भूमिका खासदार संभाजीराजेंनी राज्य सरकारवर टीका करत घेतली. मराठा समाजात आक्रोश होईल, असा इशारा दिला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मराठा समाजाकडून येणाऱ्या प्रतिक्रिया लक्षात घेता राज्य सरकार मेगा पोलीस भरतीत मराठा समाजासाठी १३ टक्के जागा राखीव ठेवण्याबाबत विचार करत आहे. मराठा समाजाचं आरक्षण टिकावं यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. परंतु पोलीस भरतीत १३ टक्के जागा ठेवण्याबाबत कायदेशीर बाब तपासून पाहणार, असं आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं आहे.
राज्य सरकारने पोलीस भरतीचा घेतलेला निर्णय योग्य नाही, आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाज व्यथित आहे. त्यात सरकारचं टाइमिंग चुकलं आहे. ही भरती करणे म्हणजे मराठा समाजाला चिथावणी देणारं आहे. आणखी काही काळ थांबावं, जे काही लक्ष केंद्रीत करायचं असेल ते आरक्षण कसं लागू करु शकता याचा विचार करावा. थोड्या दिवसाने भरती करण्यास अडचण काय? पोलिसांवर तणाव आल्यामुळे पोलीस भरती करताय असं म्हणता, पण मास्क घालून पोलीस भरती घेणार कशी? असा सवाल संभाजीराजेंनी राज्य सरकारला विचारला आहे.