नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये हायवेजवळ ५२ किलो स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती टाळण्यात भारतीय लष्कराला मोठं यश मिळालं आहे. याशिवाय ५० डिटोनेटरही सापडले आहेत. पुलवामा हल्ला झाला होता, तेथून काही अंतरावरच इतका मोठा स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)
महत्त्वाचं म्हणजे पुलवामा दहशतवादी हल्ला ज्या ठिकाणी झाला होता तेथून फक्त नऊ किमी अंतरावर ही स्फोटकं सापडली आहेत. भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध करत दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८ वाजता सर्च ऑपरेशन सुरु असताना एका बागेत पाण्याची टाकी पुरुन ठेवण्यात आली असल्याचं निदर्शनास आलं. या पाण्याच्या टाकीत जवळपास ५२ किलो स्फोटकं सापडली. जवळपास ४१६ पाकिटं होती. यामधील प्रत्येक पाकिटात १२५ ग्राम स्फोटकं होती. अजून शोध घेतला असता अजून एक टँक सापडला ज्यामध्ये ५० डिटोनेटर होते. या स्फोटकांना ‘सुपर ९०’ म्हटलं जातं.
* पुलवामा हल्ल्यात ४० जवान शहीद
गतवर्षी फेब्रुवारी २०१९ महिन्यातील १४ तारखेला आत्मघाती हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेल्या कारने सुरक्षा ताफ्याला धडक दिली होती. या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. या दुर्देवी घटनेने देश हळहळला होता. अशाच हल्ल्या करण्याचा कट रचला जात होता, असा निष्कर्ष जप्त स्फोटकांवरुन काढला जात आहे.