काल शूज पॉलिश करण्यासाठी मी पार्क चौकातील फुटपाथवर बसलेल्या पॉलिशवाल्याकडे गेलो होतो. तसा मी मोस्टली शूज घरीच पॉलिश करतो. पण परवा पाऊस झाला होता त्यामुळे बुटाच्या बाजूला थोडासा चिखल लागला होता आणि तो वाळून गेला होता. ते घरी साफ करणं जिकिरीचं जातं म्हणून पॉलिशवाल्याकडून एकदा स्वच्छ करुन घ्यावं म्हणून मी तेथे गेलो होतो. काळासावळा, गुटगुटीत, पांढरा शुभ्र हाफ शर्ट घातलेला, नाकावर व्यवस्थित मास्क लावलेला (नाहीतर, अनेकांचा असा समज झालाय की मास्क हा हनुवटी झाकण्यासाठीच असतो), कपाळावर चंदनाचा टिळा, त्यात छोटासा बुक्क्याचा गोल आणि मुखी गजानन महाराजांचं नाव असा साधारण साठीचा हा माणूस आपल्या व्यवसायाचा पसारा मांडून फूटपाथवर झाडाच्या सावलीत बसलेला. त्या पॉलिशवाल्याकडे एक माणूस आधीच चपला पॉलिश करुन घेण्यासाठी थांबला होता. त्याचं काम चालू होतं. मी तेथे जाताच पॉलिशवाल्याने माझ्याकडे पाहून नमस्कार साहेब, दोन मिनिटे थांबा हं, यांचं होतंच आलंय. त्यांचं झालं की लगेच तुमचे घेतो असं म्हणून माझ्याकडे पाहून अगदी प्रेमळ आणि ओळखीचं असं स्माईल केलं.
मी “ठीक आहे” म्हणून झाडाच्या सावलीत थांबलो. दोनच मिनिटात आधीच्या माणसाचं काम झालं आणि त्या पॉलिशवाल्याने मला शूज देण्यास सांगितले. मी पायातले शूज काढताच त्याने दोन स्वच्छ स्लीपर्स माझ्याकडे सरकावल्या. सध्या कोविडचा संसर्ग असल्याने मी त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करुन सॉक्सवरच उभा राहिलो. तेव्हा तो पॉलिशवाला पुन्हा म्हणाला, “साहेब, तुमचे सॉक्स खराब होतील. या चपला पायात घाला ना. त्या सॅनीटाईज केलेल्या आहेत.”
“अरे बापरे”, याला माझ्या मनातलं कसं कळालं? म्हणून मी आश्चर्यचकीत!
मी म्हणालो, “नाही नाही, ठीक आहे. मी उभा राहतो इथेच.”
आणि मग त्याचं काम सुरू झालं. मी त्याच्या कामाकडे निरखून पहात होतो. प्रथम त्याने त्याच्याकडच्या रापीने माझ्या बुटाला लागलेला सगळा चिखल खरडून काढला आणि मग एका ओल्या फडक्याने बुटाच्या कडा स्वच्छ केल्या. त्यानंतर एका ब्रशवर पॉलिश घेऊन ती दोन्ही बुटांना नीट लावून घेतली. मग ते बूट थोडेसे वाळू दिले. त्यानंतर दुसऱ्या एका ब्रशने पॉलिश व्यवस्थित सगळीकडे पसरवली. पुन्हा थोडावेळ जाऊ दिला. त्यानंतर तिसरा ब्रश घेऊन बुटाला चकाकी आणण्याचा प्रयत्न केला. थोडीशी चकाकी येताच त्याने एक छोटीशी डबी उघडली. त्यातली क्रीम घेऊन बोटाने ती दोन्ही बुटांना व्यवस्थित लावून घेतली. त्यानंतर पुन्हा ब्रश घेऊन बुटांना चकाकी आणली. बूट छान चमकायला लागले. मला बरं वाटलं. मी बूट घेण्यासाठी पाय पुढे केला तेवढ्यात तो म्हणाला, “साहेब जरा थांबा, तुमची पॅन्ट लाईट कलरची आहे. हा रंग पॅन्टला लागू शकतो”, असे म्हणून त्याने पिशवीतून एक स्वच्छ नायलॉनचं फडकं काढलं आणि ते बुटावर व्यवस्थित घासून बूट आणखी चमकवले आणि म्हणाला, “हं, साहेब घाला आता बूट. हा कलर आता पँटला लागणार नाही बरं का”. त्याने दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि मला विचारलं, “साहेब सेवा आवडली का? पहिल्यांदा आलात. आवडलं असेल काम तर पुन्हा या बर का.”
मला त्याचं मनोमन कौतुक वाटलं. मी त्याला किती पैसे झाले असं विचारणार तेवढ्यात दोन छोट्या मुली, साधारण आठ दहा वर्षाच्या, धापा टाकत तेथे आल्या. एका हातात तुटलेली सँडल, दुसऱ्या हातात दहाची नोट आणि धावत आल्यामुळे चेहऱ्यावरुन घाम निथळत असलेला. त्यातल्या एका मुलीने धापा टाकतच विचारलं, “काका एवढी सँडल शिवून देता का?”
“हो, देतोना. दे इकडे. आणि बाळांनो असे इकडे सावलीत उभे रहा. तिकडे तुम्हाला ऊन लागेल.”
(सोलापूरात बारा महिन्यात चार ऋतू येतात. उन्हाळा, सौम्य उन्हाळा, तीव्र उन्हाळा आणि अति तीव्र उन्हाळा.) थोडंसं सावलीत येऊन एका मुलीने विचारलं, “पण काका याचे पैसे किती होतील?”
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“याचे बघ बाळ वीस रुपये होतील. कारण आता जिथे उसवलीय तिथेच फक्त टाके घातले ना, तर दोन दिवसांनी पुन्हा ते दुसरीकडून निघणार, म्हणून मला दोन्ही सँडलला पूर्णच शिवावं लागेल. त्याचे वीस रुपये होतात.”
“पण काका, माझ्याकडे दहाच रुपये हायेत. दहा रुपयात होतंय म्हणली होती मम्मी.”
“नाही बेटा, काम जास्त आहे. जा, घरी जाऊन मम्मीकडून अजून दहा रुपये घेऊन ये.”
“न्हाई, आता मम्मी कामावर गेलीय. घरी आज्जी एकटीच असती, तिच्याकडं पैसे नसतेत. करा की दहा रुपयात.”
त्या छोट्या मुलींना उन्हात परत पाठवणं त्याला जीवावर आलं. तो म्हणाला, “बरं थांब, देतो करुन. पण जमेल तेव्हा उरलेले दहा रुपये आणून दे बरं का.” असं म्हणून त्याने सँडल घेतले आणि काम सुरु केलं. मी त्याला माझे पैसे किती झाले असं विचारणार तेवढ्यात तो त्या मुलींना म्हणाला, ” कुठून आलात बाळांनो तुम्ही?”
“आमी जुनी मिल चाळीतून आलो.”
“अगं, लांबून आलात की. खाली बसा जरा सावलीत. काय काम करते मम्मी तुमची?”
“आमच्या शाळेतल्या मॅडमच्या बाळाला सांबाळायला जाती मम्मी.”
“पण, मॅडम घरीच असतील ना आता, शाळेला तर सुट्टयाच आहेत की.”
“शाळेला सुट्टी हाय, पण मॅडम मोबाईलवर शिकवतेत तवा मम्मी बाळाला सांबाळती.”
“असं होय. पण अगं, मॅडम तिकडे शिकवतात आणि तू इकडे कुठं फिरतेस?”
“काका, आवो माज्याकडं मोबाईल न्हाई. मम्मी मॅडमकडून ल्हीवून आणती अब्यासाचं. मग मी ते परत माज्या व्हईत ल्हीवून काडते रात्रीच्याला.”
“बरं बरं, खूप अभ्यास करुन कुणीतरी मोठी हो बरं का बाळ. हे घे, झाले बघ दोन्ही सँडल टाके घालून.”
“आता न्हाई तुटणार ना परत?”
“नाही बाळ, मी मजबूत केलंय त्याला. तू नको काळजी करु.”
“हां, हे घ्या दहा रु, थ्यांकू काका.”
“बाळ, असूदे गं हे पैसे तुझ्यापाशीच. तू शाळा शिकतेस ना, मग तुला कशाला तरी हे पैसे उपयोगी येतील, ठेव.”
मुलगी पुरती गोंधळून गेलेली. तिला काहीच समजेना. त्यातूनही ती म्हणाली, ” आवो काका, मम्मी वरडल की मला, फुकट कशाला म्हणून? हे घ्या दहा रुपये.”
“अगं असूदे, तिला माझं नाव सांग.”
“काय नाव सांगू?”
“संजय राऊत म्हणून सांग.”
“बरं, सांगते. थ्यांकू.”
मुलीने सँडल्स पायात अडकवल्या आणि दोघीनी घराकडे धूम ठोकली. मी मात्र पॉलिशवाल्याचं नाव ऐकून उडालोच. एक तर आठ दिवसांपासून टीव्हीवर चोवीस तास हेच नाव गाजतंय आणि हाच परत आपल्या समोर! मी खात्री करण्यासाठी त्याला पुन्हा विचारलं, “काय नाव म्हणालात आपलं?”
“संजय राऊत. संजय ज्ञानेश्वर राऊत.”
“मला वाटलं सतत टिव्ही, पेपरमध्ये ऐकून आणि वाचून तुमच्याकडून चुकून हे नाव तोंडातून बाहेर पडलं की काय.”
“नाही साहेब. माझं खरंच नाव आहे हे.”
मी म्हणालो, “दादा, तुमचं बोलणं तर स्वच्छ आणि शुद्ध आहे. तुम्ही शिकलेले दिसता. मग हे काम का करताय?”
“साहेब, साखर कारखान्यात नोकरीला होतो. रिटायर होऊन चार वर्षे झाली. तीन मुलींची लग्न, बाळंतपण ह्यात आलेला पैसा संपला. आपल्याला काय पेन्शन नाही. मुलाचं लग्न झालंय. त्याचा त्याला प्रपंच आहे. त्याच्यावर आपलं ओझं कशाला? म्हणून रिटायर झाल्यावर ही सेवा चालू केलीय. वडील हाच उद्योग करायचे. कधीतरी त्यांना मदत म्हणून मी पण जायचो त्यांच्यासोबत. त्याचा आता उपयोग होतोय.”
“किती पैसे मिळतात दिवसभरात?”
“चारशे, साडेचारशे होतात की दिवस मावळोस्तोर. त्यात नवरा बायकोचं भागतं आरामात.”
“हो का? मग मघाशी त्या मुलीचे पैसे नाही घेतले?”
“साहेब, मी माळकरी आहे. गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला जाताना दरवर्षी दोन दिवस सोलापूरात असते. दोन दिवसात सर्व वारकऱ्यांच्या चपलाची दुरुस्ती, डागडुजी करुन देतो सेवा म्हणून. वडीलपण असं करायचे, तेच पुढे चालू ठेवलंय. मुलींच्या रुपाने गजाननाने आपली सेवा करवून घेतलीय असं मी मानतो.”
“तुम्ही याला काम न म्हणता सेवा म्हणता हे खूप आवडलं.”
“साहेब, आपल्याकडे पूर्वी ग्यानी झैलसिंग राष्ट्रपती होते. त्यांनी एकदा परिमार्जन म्हणून एक दिवस पादत्राणे नीट ठेवण्याची सेवा बजावली होती, आठवतं का? अहो, मी किती भाग्यवान मला ही सेवा करण्याची संधी रोजच मिळतेय. सेवा देत असताना कोणी पैसे दिले तर ठीक, नाही दिले तर त्याहून ठीक. आता त्या एवढ्याशा मुलीकडून किती पैसे घ्यायचे हो? दिले सोडून, सेवा म्हणून!”
मी त्या माणसाचे विचार ऐकून स्तब्ध. “बाळा, एवढ्या उन्हात तू तुझे कोवळे पाय जमिनीवर अनवाणी कसे ठेवशील? हा विचार, गजानना तुझ्या दारी नतमस्तक झाल्याशिवाय स्फुरणार नाही, हेच खरं!”
© हा लेख कॉपी राईट केलेला असल्याने शेअर करावयाचा झाल्यास माझ्या नावासह करावा अशी विनंती आहे.
– प्रभाकर जमखंडीकर, सोलापूर