सोलापूर : कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहर आणि जिल्ह्यात मास्कची सक्ती करण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज पालिका आणि जिल्हा प्रशासनाला केल्या.
सोलापूर शहरातील वॉर्ड 15 मध्ये ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेच्या पाहणीदरम्यान पालकमंत्री भरणे बोलत होते. यावेळी महापौर कांचना यन्नम, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, नगरसेवक चेतन नरोटे, वैष्णवी करगुळे, विनोद भोसले, उपायुक्त धनराज पांडे, संतोष पवार, मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. शीतल जाधव आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जिल्ह्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, सर्व नागरिकांची साथ हवी. ग्रामीण नागरिकांनीही आपली आणि कुटुंबाची जबाबदारी घ्यायला हवी. शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे योग्य पालन केले तर कोरोनाला दूर ठेवता येते. प्रशासकीय पातळीवर रूग्ण आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडणार नसल्याची खात्री श्री. भरणे यांनी दिली.
नागरिकांचा या मोहिमेत सहभाग महत्वाचा आहे. माणूस जगविण्यासाठी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम लोकचळवळ निर्माण करायची आहे. लोकप्रतिनिधींनी जनजागृतीचे काम करण्याचे आवाहनही श्री. भरणे यांनी केले.
पालकमंत्री भरणे यांनी रेवणसिद्ध कोळी यांच्या घरी आरोग्य पथकांसह भेट देऊन सर्वेक्षणाची पाहणी केली. त्यांनी कोळी यांच्या कुटुंबाला गर्दी टाळा, लहान मुलांची काळजी घेण्याच्या सूचना केल्या. सर्वेक्षणादरम्यान आरोग्य पथकांनी योग्य खबरदारी घेऊन सर्वेक्षण करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
“कोरोनाला हद्दपार करण्यासाठी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकांनी आपली आणि कुटुंबाची जबाबदारी ओळखून मास्कचा वापर करायला हवा. वारंवार हात धुवा, सॅनिटायझरचा वापर करा. गर्दीत जाणे टाळा. लहान मुले आणि वृद्धांची काळजी घ्या. त्यांना गर्दीत जावू देऊ नका. प्रत्येकाने आपले कुटुंब निरोगी राहण्यासाठी पुढाकार घेतला तर ही मोहीम यशस्वी होईल”
– दत्तात्रय भरणे, पालकमंत्री