वेळापूर : शुक्रवारी दिवसभर हवामान ढगाळ होते. दुपारी ३ नंतर पिलीव, निमगाव, कुसमुड , मळोली, वेळापूर या परिसरात जोरदार सलग चार-पाच तास पावसाच्या सरी कोसळल्याने आनेक ओढ्यांचे पाणी एकञीकरण होऊन तोंडले— बोंडले येथील नंदाच्या ओढ्यात आले. ढगफुटीसारखा मोठा पाऊस झाल्याने इतिहासात पहिल्यादाच नंदा ओढ्याला पूर आला.
माळशिरस तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तोंडले-बोंडले येथील नंदाच्या ओढ्याला आलेल्या पुरामुळे एकाच रात्रीत ओढ्या काठच्या शेतकरी, रहिवासी, दुकानदार, तोंडले ग्रामपंचायत कार्यालय, दूध बल्क यांचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले आहे.
अगोदर झालेल्या पावसामुळे या परिसरातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, पाझर तलाव तुडुंब भरले आहेत. त्यातच काल पिलीव परिसरात झालेल्या प्रचंड पावसामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी नंदाच्या ओढ्यात एकत्रित मिसळले.
अचानकपणे तोंडले-बोंडले येथे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास ओढ्यातून वाहणारे पुराचे पाणी रात्री दीड वाजेपर्यंत पात्राबाहेर पडून दोन्ही गावच्या शेतात घुसले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या पूर परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग रहिवासी, व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, जिल्हा परिषद सदस्या स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानभरपाईसाठी प्रशासनाने तात्काळ पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. तसेच मळोली ता. माळशिरस येथेही ओढ्याचे पाणी वेगाने वाढुन लगत राहणार्या ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे.
* विक्रमी पावसाची नोंद
मागील काही दिवसापासून सलग पाऊस पडत असून काल माळशिरस तालुक्यात सर्व मंडलामध्ये ९१५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. यापैकी नंदाच्या ओढ्याचे उगमस्थान असलेले पिलीव मंडलामध्ये ढगफुटी सारखा सर्वाधिक २२१ मिलिमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.
* वीस दुकाने गेली वाहून
ओढ्याला आलेल्या पुरामुळे केळी, ऊस, डाळिंब, मका अशा पिकासह शेतातील माती, घरातील संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहे. वीज पुरवठा करणाऱ्या तारांचे २० ते ३० खांब व ३ डीपी जागीच कोसळले आहेत. एक छोटाहाती गाडी व एक मोटारसायकल पाण्यात वाहून गेली आहे. तोंडले येथील ओढ्यालगतची २० दुकाने वाहुन जाऊन मोठे नुकसान झाले आहे. दुधाच्या बल्क कुलरचे दुधासह टाकीव साहित्य वाहुन जाऊन १५ लाखापेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
* ग्रामपंचायतीची कागदपञे नष्ट
ओढ्यालगत असलेल्या तोंडले ग्रामपंचायत कार्यालयात वेगाने पाणी घुसून कार्यालयात मोठ्या प्रमाणात चिखल होऊन ग्रामपंचायतीची कागदपञे पूर्णपणे नष्ट झाली आहेत. तसेच नंदाच्या ओढ्यावरील पुलाचे साईड गार्ड तुटली असून तोंडले गावाकडील भरावा खचून पुलाचा काही भाग वाहून जाऊन मोठा खड्डा पडून दोन्ही गावाचा जवळचा असलेला मार्ग बंद पडला आहे.
ओढ्यातील पुराच्या पाण्याने पंचक्रोशीतील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या ह. भ. प. बाळू पाटील महाराज यांच्या समाधीच्या कलशा सह असणारे छत्र पाण्यात कोसळून वाहून गेले आहे.
* पत्रकार मित्राची तप्तरता
रात्रीच्या सुमारास मळवली ओढ्यात वेगाने पाणी वाढल्याची कल्पना पत्रकार मित्र विजय देशमुख यांना येताच त्यांनी दोन्ही गावातील संबंधित ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांना कल्पना देऊन ओढ्यालगत राहत असलेल्या ग्रामस्थांना वेळेतच लांब हलविण्यात आले ओढ्यात पाणी वेगाने वाढत असल्याने ग्रामस्थांना कपड्यांसह गुरे घेऊन बाहेर पडावे लागले. त्याने दाखवलेल्या तत्परतेमुळे जनावरांचा जीव वाचला.
संकलन : महादेव जाधव, पत्रकार
(सुराज्य डिजिटल, वेळापूर)