मोहोळ : मोहोळ पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका अधिकाऱ्यासह दोन पोलिस कर्मचारी असे तिघांना निलंबित करण्यात आल्याची घटना मोहोळ येथे घडली आहे. पीएसआय सागर ढाकणे, ए एसआय सलिम शेख व पोकॉसंतोष पवार अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की आष्टी येथे कॅनॉलच्या कडेच्या बांधकाम विभागाच्या जागेत बऱ्याच लोकांनी टपऱ्या टाकून, शेड मारून व्यवसाय सुरू केला आहे. अनिकेत धैर्यशिल पाटील यानेही टपरी टाकण्यासाठी जागेची साफसफाई केली होती. मुरूम टाकला. परंतु दुसऱ्याच व्यक्तीने त्या ठिकाणी शेड मारण्यास सुरुवात केली.
त्यावेळी अनिकेत पाटील याने त्यांना अडवण्याचा प्रयात्न केला. यात त्यांच्यात भांडण झाले. अर्धवट मारलेले शेड पाडले. शेड काढल्याचा राग मनात धरून समोरच्या व्यक्तीने अनिकेत विरोधात चुकीची तक्रार केली होती. याबाबत त्यास काहीच माहिती नव्हते. तो दुसऱ्या कामासाठी मोहोळ तहसील कार्यालयाच्या आवारात आला असता पवार पोलिस कर्मचाऱ्याने त्यास बोलावले व मारहाण करून लॉकअपमध्ये टाकले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यांना त्याने याबाबत विचारणा केली असता चोरी करतोस म्हणून तक्रार असल्याचे त्यास सांगितले. त्याला बाहेर काढण्यासाठी पो.कॉ. पवार, एएसआय शेख व पीएसआय ढाकणे यांनी ५० हजार रूपयाची मागणी केली होती. अन्यथा दरोड्याची केस टाकतो, अशी धमकी दिली होती. २५ हजार रूपये घेवून त्यास सोडून देण्यात आले होते.
अशा पध्दतीने अनिकेत पाटील याच्यावर अन्याय झाल्याची तक्रार सोलापूर पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्याकडे केली होती. त्यानुसार याबाबत तपास करून त्या पो. कॉ. पवार, एएसआय सलिम शेख व पीएसआय ढाकणे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.