मुंबई : भिंवडी परिसरात पहाटेच्या सुमारास तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस आणि एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाले आहेत. भिवंडीमध्ये भल्या पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास 25 कुटुंब असलेली तीन मजली इमारती कोसळली. सुरुवातील पाच मृत्यू, नंतर आठ तर आता मृतांचा आकडा 12 वर पोहचला असून आणखी मदतकार्य चालूच आहे.
मोठा आवाज झाला म्हणून आजूबाजूचे लोक काय झालं पाहायला आले. या कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली साधारण 100 लोक अडकल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यापैकी 12 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलं आहे तर अनेकजण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान भिवंडी परिसरात पाऊस सुरू असल्यानं बचावकार्यात अडथळा येत आहेत. भिवंडी शहरातील पटेल कंपाऊंडमधील जिलानी तीन मजली इमारत कोसळली.
इमारत कोसळल्याची माहिती काही नागरिकांनी पोलिसांना दिली. ही तीन मजली इमारत 40 वर्षांपूर्वीची आहे. यामध्ये साधारण 25 कुटुंब आणि 100 च्या आसपास लोक राहात होते. एनडीआरएफ आणि पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे. 24 ऑगस्टला महामध्ये 5 मजली इमारत कोसळून दुर्घटना घडल्याचं समोर आलं होतं.