पुणे : मराठा समाजाच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाचा विषय गुंतागुंतीचा करु नये, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. मराठा नेत्यांनी थोडा संयम बाळगावा कारण या विषयात अधिक गोंधळ वाढला तर राज्यातील आरक्षणही गमवायची वेळ येऊ शकते, असा सल्लाही आंबेडकर यांनी दिला आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
ओबीसी समाजानं मोठं मन करुन मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करुन घ्यावं, असं काही नेत्यांचं म्हणणं आहे. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मी जे काही सोशल मीडियावर वाचतोय त्यावरुन हेच दिसतंय की, मराठा समाजाला आरक्षण मिळावं मात्र आमच्या ताटातलं नको, अशी ओबीसी समाजाची भूमिका आहे. त्यामुळे माझं सर्व मराठा नेत्यांना आवाहन आहे की, त्यांनी हा वाद अधिक गुंतागुंतीचा करु नये. ओबीसीमध्ये हिस्सा मागण्याच्या भानगडीत मराठा नेत्यांनी पडू नये.”
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मराठा आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणीला आल्यास मुंबई हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्ट कायम ठेवेल त्यामुळे निकाल मराठा समाजाच्याच बाजूने लागेल. त्यामुळे सुरळीत चाललेलं आंदोलन, मागणी सुप्रीम कोर्ट मान्य करण्याच्या परिस्थितीत आहे. त्याला खो घालू नये, असं माझ्या सर्व मराठा नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे,” असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
* मराठा समाज देशात दोन टक्के
मराठा समाज हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जरी मराठा समाज १६ टक्के असला तरी देशात तो फक्त २ टक्के आहे. त्यामुळे देशभरातील ओबीसी जर एकत्र आले तर मराठा समाजाला जे महाराष्ट्रापुरतं मिळणार आरक्षण आहे तेही मिळणार नाही. म्हणून सुप्रीम कोर्टाच्या एका स्टे ऑर्डरने मराठा समाजाने घाबरुन जावू नये,” असे आवाहनही आंबेडकर यांनी केलं आहे.