मुंबई : जिल्ह्यातील प्रश्नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत आज बुधवारी मुंबईत जिल्ह्यातील नेत्यांची बैठक आहे. यात भाजपनेते एकनाथराव खडसे यांच्या प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या पुन्हा चर्चा चालू झाल्या असल्या तरी भाजपने याचा इन्कार केला असून खडसे भाजप सोडून जावूच शकत नसल्याचे ठणकावून सांगितले जात आहे.
जळगाव जिल्ह्यात संघटनात्मक आढावा तसेच माजी मंत्री व भाजपवर नाराज नेते एकनाथराव खडसे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत चाचपणी करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बुधवारी जिल्ह्यात येणार होते. मात्र त्यांचा दौरा रद्द झाला आहे. त्याऐवजी शरद पवार यांनीच मुंबईत बैठक घेतली. पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांना मुंबईत बैठकीसाठी पाचारण करण्यात आले आहे. पक्षाच्या कार्यालयात ही बैठक झाली.
भाजपाचा उत्तर महाराष्ट्रातील मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. खुद्द शरद पवार यांनी याबाबत स्थानिक नेत्यांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. यात जिल्ह्यातील राजकीय समीकरणावर काय परिणाम होतील याची माहिती शरद पवारांनी जाणून घेतली. उत्तर महाराष्ट्रातील नेता म्हणजे एकनाथ खडसे यांच्या नावाचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
मात्र याबाबत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नकार दिला आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, माझ्या आयुष्यात राजकारणाची किंवा व्यक्ती समजण्यासाठी थोडी समज असेल तर एकनाथ खडसे दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही.
खडसेंचे काम विचारासाठी आहे ते व्यक्तीसाठी नाही. खडसेंना विधानसभा निवडणुकीवेळीही अनेक ऑफर आल्या पण त्यांनी पक्ष सोडला नाही. त्यांच्या विचाराची श्रद्धा ही अंबुजा सिमेंटच्या दिवारासारखी अतुट शक्ती है पण विचारांची श्रद्धा तुटू शकत नाही. संवादाच्या माध्यमातून सगळे प्रश्न सुटतील. आमच्या आधीपासून त्यांनी पक्षासाठी भरपूर काही केलं आहे. त्यांचा त्यागाचा सन्मान आहे. भाजपा पक्ष नाही तर परिवार आहे, असे विचार मनात आणू नका, असं त्यांनी माध्यमांना सांगितले.
त्याचसोबत एकनाथ खडसे कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे नेते आहेत, जिना यहा मरना यहा इसके सिवा जाना कहा, काही घटनांबद्दल दु:ख असू शकतात. पण खडसे भाजपा सोडून इतर पक्षात जाऊच शकत नाही, दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली, तरीही खडसेंना डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊ देत नाही. खडसेंच्या मनाला दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार शिवू शकत नाही, असा दावा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रातील हा नेता भाजपात नाराज असल्याची चर्चा आहे. या नेत्याला पक्षात घेतल्यास त्याचा कितपत फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो याची चाचपणी शरद पवार घेत आहेत. यात राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर, आमदार अनिल पाटील यांच्यासोबत आढावा घेण्यात येत आहे. भाजपातून या नेत्याला राष्ट्रवादीत घेण्याबाबत स्थानिक नेत्यांची मते जाणून घेण्यासाठी शरद पवारांनी बैठक बोलावली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याबाबत मराठी वृत्तवाहिन्यांनी केलेल्या दाव्यानुसार उत्तर महाराष्ट्रात भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे आक्रमकपणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. फडणवीसांनीच माझं तिकीट कापलं, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, आता मी यावर पुस्तक लिहिणार असल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितले होते.
त्यामुळे जर एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असतील तर जळगाव जिल्ह्यातील पक्षीय राजकारणात याचा काय परिणाम होऊ शकतो याबाबत शरद पवारांच्या बैठकीत खलबतं होणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वीही एकनाथ खडसे भाजपाला रामराम करणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र ती केवळ चर्चा होती. त्यांनी भाजपातच राहणे पसंत केले, परंतु एकनाथ खडसेंनी आता पक्षातील विरोधकांविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने, पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आलं आहे.
* राजकारणात जर-तरला फार महत्व नसते
राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्वाची बैठक झाली. यावेळी भाजप ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.मात्र, खडसेंबाबत कोणीतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहे.
जयंत पाटील म्हणाले कि, राष्ट्रवादीच्या बैठकीत जळगाव जलसिंचन प्रकल्पाबाबत चर्चा झाली. यामध्ये एकनाथ खडसे यांच्याविषयीची कोणतीही चर्चा झाली नाही. खडसे यांच्या नाराजीबाबत त्यांच्या पक्षाने विचार करावा, असा सल्लाही जयंत पाटील यांनी भाजपला दिला. तसेच, भविष्यात खडसे राष्ट्रवादीत येतील का? यावर जयंत पाटील यांनी राजकारणात जर-तरला फार महत्व नसते असे उत्तर दिले.