सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेचा शुभारंभ झाला असून लोकप्रतिनिधींसोबतच आता विविध धर्माचे धर्मगुरू आणि सामाजिक संस्था उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेत सहभागी होण्याचे धर्मगुरूंना आवाहन केले होते. धर्मगुरूंनी मोहिमेच्या जनजागृतीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी, क्षेत्रिय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, पोलीस निरीक्षक महावीर सकळे यांच्यासह सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, विविध धर्माचे धर्मगुरू उपस्थित होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी कोरोना कसा होतो, काय काळजी घ्यावी. विलगीकरण का केले जाते, कोरोनाची साखळी तोडणे कसे गरजेचे आहे, याबाबत सविस्तर मांडणी केली. अनेकजण मास्कचा वापर करीत नाहीत. स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेत नाहीत, तपासणीसाठी पुढे येत नाहीत. त्यांच्यामध्ये गैरसमज आणि भीती आहे, हे दूर करण्यासाठी प्रशासन काम करीत आहे. वेळीच निदान आणि उपचार घेतल्यास कोरोनापासून वाचता येते. धर्मगुरूंनी आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला तर समाज त्यांचे ऐकेल आणि कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करता येईल. विविध धर्मातील लोक धर्मगुरूंचे ऐकतात, या माध्यमातून कोरोनाविषयी जनजागृती करूया. जनतेचे सहकार्य असेल तर मोहीम यशस्वी होईल. आपल्या हिताची मोहीम असल्याने सहकार्य करा, असे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले.
आवाहनाला प्रतिसाद देत धर्मगुरू, सामाजिक संस्थांनी शासनासोबत काम करण्याची तयारी दर्शवली.
उद्योगवर्धिनीच्या चंद्रिका चव्हाण यांनी वेगवेगळ्या समाजातील अध्यक्ष आणि महिला मंडळाचे अध्यक्ष यांनी समाजात कोरोना आणि माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेची जनजागृती करता येईल, असे सूचविले. शिवाय यामध्ये स्पर्धा लावल्यास काम उत्कृष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.
युवा वर्ग बाहेर जात असल्याने घरातील इतरांना कोरोनाची लागण करतो. धर्मगुरूंनी तरूणांना आवरण्याचे आणि त्यांना समजावण्याचे आवाहन पेलले आहे.
लॉकडाऊनच्या काळात विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने निराधार, गरजूंना जेवणाची सोय पाकिटाद्वारे करण्यात आली होती. जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात केतन वोरा यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
बैठकीला सिद्धेश्वर देवस्थानचे पुजारी राजेश हब्बू, संतोष हिरेहब्बू, आनंद हब्बू, मल्लिनाथ मसरे, राजशेखर हिरेहब्बू, किशोर गजे, संजय हंचाटे, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अरविंद कोंडा, जामा मस्जिदचे चेअरमन महमद अयुब म. हनीफ मंगलगिरी, ट्रस्टी अनीस अमिन सो दुरूगकर, उद्योगवर्धिनीच्या चंद्रिका चव्हाण, प्रार्थना फाऊंडेशनचे प्रसाद मोहिते, संभव फाऊंडेशनचे आतिश शिरसट, जनआधार फाऊंडेशनचे आनंद गोसकी, आस्था रोटी बँकेचे आनंद तालिकोटी, अमृतवेल ट्रस्टचे हरीष कुकरेचा, सोलापूर सामाजिक संस्थेचे सुहास कदम आदी उपस्थित होते.