अबूधाबी : रोहित शर्मा यांच्या शानदार फलंदाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने कोलकाता संघाचा 49 धावांनी पराभव करत विजय साकारला. पहिल्या सामन्यात मुंबईला पराभव पत्करावा लागला होता पण अखेर आज मुंबईने विजयाचं खात उघडलं. रोहित शर्मा सामन्याचा मानकरी ठरला.
कोलकता विरोधात नेहमीच यशस्वी ठरणाऱ्या मुंबई इंडियन्सने ही परंपरा कायम राखली आणि आयपीएलच्या 13 व्या हंगामात विजयाचा श्रीगणेशा केला. 49 धावांनी विजय मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने निर्णायक 80 धावांची खेळी केली.
कोलकताविरुद्ध मुंबईने आजच्या सामन्यापूर्वी 10 पैकी नऊ लढती जिंकल्या आहेत. रोहितच्या शानदार खेळीमुळे 195 धावा करणाऱ्या मुंबईने कोलकता संघाला 146 धावांवर रोखले. अमिरातीमधील मुंबईचा हा पहिला विजय ठरला.
चेन्नईविरुद्ध गोलदाजीत केलेल्या चुका आज मुंबई सुधारल्या आणि पहिल्यापासून त्यांच्या डावावर वर्चस्व मिळवले. गिल आणि नारायण ही सलामीची जोडी झटपट बाद केली त्यानंतर भले दिनेश कार्तिक आणि नितिश राणा यांना डाव सावरला, परंतु आवश्यक धावांचा बोजा वाढत गेला. त्यातच ते बाद झाले.
मुंबईला भिती होती ती आंद्रे रसेल आणि मॉर्गन यांच्याकडून परंतु बुमारने आपल्या एकाच षटकात या दोघांना बाद करुन मुंबईचा विजय निश्चित केला. सलग दुसऱ्या सामन्यात नाणेफेक गमवल्यामुळे प्रथम फलंदाजी करावी लागलेल्या मुंबईला सुरवातीला धक्का बसला. गेल्या सामन्यात शानदार फलंदाजी करणारा डिकॉक बाद झाला. परंतु कर्णधार रोहितला चांगला सूर सापडला. कोलकता संघाविरुद्ध रोहितचे बॅट हमखास तळपते आजही ती बहरली. 148 च्या स्ट्राईक रेटने त्याने 54 चेंडूत 80 धावा केल्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रोहित आणि सूर्यकुमार यादव यांनी दुसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली. त्यावेळी मुंबई द्विशतकी मजल मारणार हे निश्चित वाटत होते. सूर्यकुमार बाद झाल्यावर आलेल्या तिवारीने छोटेखानी 21 धावांची खेळी केली. परंतु ज्याच्याकडून आशा होत्या त्या हार्दिक पंड्याने पुन्हा एकदा निराशा केली, तो स्वयंचीत झाला.
150 वा आयपीएल सामना खेळणाऱ्या पोलार्डने अखेरच्या षटकांत आक्रमता दाखवल्यामुळे मुंबईला 195 धावा करता आल्या.