नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर जवळपास 8 महिन्यांनी जे. पी. नड्डा यांनी पक्षाची नवी टीम तयार केली आहे. या नव्या धुरिणांमध्ये महाराष्ट्रातल्या दोन मोठ्या नेत्यांची नावं आहेत. मात्र नाराजीच्या परमोच्च शिखरावर असलेले एकनाथ खडसे यांना पुन्हा डावलण्यात आले आहे.
राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याखेरीज छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह आणि एकूण 12 नेते राष्ट्रीय उपाध्य आहेत. आता बड्या नेत्यांच्या सल्ल्याने पण तरुण आणि नव्या विचारांच्या नेत्यांसह पक्ष काम करणार असल्याचं नड्डा यांनी स्पष्ट केलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भाजपच्या कार्यकारिणीची घोषणा नड्डा यांनी केली. या नव्या कार्यकारिणीमध्ये महिला आणि तरुणांना मोठी संधी देण्यात आली आहे. अर्थातच महाराष्ट्रातले चार तरुण चेहरे यामध्ये आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बिहार निवडणुकीचे प्रभारी म्हणून या अगोदरच मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. आता नव्या कार्यकारिणीत विनोद तावडेंसह पंकजा मुंडे यांच्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.
गेल्या वर्षी निवडणुकीत अनपेक्षित पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याचं वृत्त सातत्याने येत होतं. त्यांना विधान परिषद किंवा राज्यसभा कुठेच जागा न मिळाल्यामुळे नाराजीच्या चर्चेला आणखी उधाण आलेलं होतं. मात्र आता पक्ष कार्यकारिणीत मोठी जबाबदारी पंकजा यांच्याकडे देण्यात आली आहे.
विनोद तावडेंना तिकिट नाकारल्यानंतर पहिल्यांदाच पक्षाने राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी दिली आहे. एकूण 13 जणांना राष्ट्रीय सचिव म्हणून नेमण्यात आलं आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रालते 4 नेते आहेत. पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुनील देवधर आणि विजया रहाटकर यांची नावं या यादीत आहेत. याशिवाय राष्ट्रीय प्रवक्त्यांच्या यादीत खासदार हीना गावित यांना स्थान देण्यात आलं आहे. अल्पसंख्याक मोर्चाचे नेते म्हणून जमाल सिद्दीकी यांचं नाव आहे.
एकनाथ खडसे पक्षातील ज्येष्ठ असूनही परत एकदा डावलण्यात आले आहे. खडसे गेले काही महिने सातत्याने महाराष्ट्रात फडणवीसांविरोधात जाहीरपणे बोलत आहेत. आपल्याला मुद्दाम डावलल्याची खंत बोलून दाखवत त्यांनी महाराष्ट्र भाजपला शालजोडीतले दिले आहेत. पण केंद्रीय पातळीवरच्या भाजप नेतृत्वाने पुन्हा एकदा खडसेंकडे दुर्लक्ष केल्याचं दिसतं. खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. हेही त्यामागचं कारण असू शकतं.
अमित शाहा यांनी पक्षाध्यक्षपद सोडल्यानंतर भाजपच्या संघटनेत अध्यक्ष म्हणून नड्डा यांनी मोठे काही बदल केलेले नव्हते. मोदी-शाहा यांच्या खांद्यावरच पक्षाची खरी जबाबदारी असल्याचं बोललं जात होतं. नड्डा यांनी अखेर पक्षाध्यक्षपद स्वीकारल्याला आठ महिने झाल्यानंतर पक्षाची नवी कार्यकारिणी जाहीर केली.