डोडोमा : उंदराचे विशेषण कोणाला लावले किंवा उंदिर नावाने संबोधित केले तर अनेकाचा पारा चढतो. मात्र एका देशात उंदराच्या कामगिरीमुळे प्रभावित होऊन उंदराला शौर्य पुरस्कार दिलाय. पहिल्यांदाच उंदराचा सन्मान केला गेला आहे. वाचा सविस्तर.
1.2 किलो वजन असलेल्या उंदराने दमदार कामगिरी करून ‘शौर्य’ पुरस्कार मिळवला आहे. ब्रिटनच्या एका संस्थेने उंदराला सुवर्ण पदक देऊन सन्मानित केलं आहे. या उंदरामुळे आतापर्यंत हजारो लोकांचे प्राण वाचले आहेत. कंबोडियामध्ये या उंदराने वास घेण्याच्या क्षमतेने तब्बल 39 भूसुरुंग शोधून काढले. तसेच 28 जिवंत स्फोटक शोधून काढून लोकांचा जीव वाचवला आहे.
आफ्रिकेत आढळणाऱ्या या उंदराचं नाव “मागावा” असं आहे. मागावा हा सात वर्षांचा आहे. ब्रिटनमधील चॅरिटी संस्था पीडीएसएने उंदराच्या कामगिरीची दखल घेत त्याला सुवर्ण पदक देऊन सन्मानित केले. एपीओपीओ या संस्थेने मागावाला या कामासाठी प्रशिक्षित केलं होतं. मागावाने कंबोडियात 20 फुटबॉल मैदानाच्या क्षेत्रफळाएवढ्या भागातून भुसुरुंग आणि स्फोटके शोधून काढण्यास मदत केली आहे. मागावाचं वजन 1.2 किलो असल्याने तो भूसुरुंगावरून चालत गेला तरी त्याच्या वजनामुळे स्फोट होत नाही. त्याला चांगल्या प्रकारे प्रशिक्षित करण्यात आलं आहे.
मागावा फक्त 30 मिनिटांत एका टेनिस कोर्टएवढ्या भागातून तो वास घेऊन स्फोटके शोधू शकतो. माणसाने बॉम्ब डिटेक्टरच्या मदतीने बॉम्बचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याला यापेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. तसेच स्फोट होण्याची देखील भीती असते. मागावाला एपीओपीओने ट्रेंड केलं आहे. ही संस्था बेल्जियममध्ये नोंदणीकृत असून आफ्रिका खंडातील टान्झानियामध्ये काम करते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
1990 पासून ही संस्था मागावासारख्या मोठ्या आकाराच्या उंदरांना प्रशिक्षण देत आहेत. एका उंदराला प्रशिक्षण देण्यासाठी एका वर्षाचा कालावधी लागतो. त्यानंतर या उंदरांना ‘हिरो रॅट’ अशी उपाधी दिली जाते आणि उंदीर ‘स्निफर डॉग’ प्रमाणे काम करतात.
1970 ते 1980 च्या दशकात कंबोडियामध्ये मोठ्या प्रमाणावर गृहयुद्ध झाले होते. या दरम्यान शत्रूला ठार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भुसुरुंगे पेरण्यात आली होती. मात्र या भुसुरुंगामुळे स्थानिक लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. एका संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कंबोडियात भुसुरुंगामुळे 1979 पासून ते आतापर्यंत सुमारे 64 हजार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर हजारो लोकांना अपंगत्व आलं आहे. ब्रिटीश संस्था पीडीएसए दरवर्षी चांगलं काम करणाऱ्या प्राण्यांचा सन्मान करते. मात्र पहिल्यांदाच एका उंदराचा सन्मान करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.