मुंबई : राज्यसभेत कृषीविधेयक मंजूर झाल्यानंतर अन्नत्याग आंदोलन करणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप नेते आणि माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सडकून टीका केली आहे. शरद पवार राज्यातील मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग आंदोलन केले असते तर अधिक बरं वाटलं असतं, असा टोलाही विनोद तावडेंनी लगावला आहे.
कृषीविषयक विधेयक नीट पाहिले तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची योजना केंद्र सरकारनं आणली आहे, अशा शब्दात विनोद तावडेंनी केंद्र सरकारवर स्तुतिसुमनेही उधळली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्यसभेत कृषीविधेयक मंजूर करताना राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह यांनी केलेल्या वर्तनावर शरद पवारांनी संताप व्यक्त केला होता. राज्यसभेच्या उपाध्यक्षांचं वर्तन चुकीचे असल्याचे सांगत शरद पवार यांनी 22 सप्टेंबरला एक दिवसासाठी अन्नत्याग आंदोलन केलं होतं. यावरून भाजप नेते विनोद तावडे यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
विनोद तावडे म्हणाले, कृषी विधेयकावरुन अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या शरद पवार मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग आंदोलन केले असते, तर अधिक बरं वाटलं असतं. शरद पवार हे स्वतः देशाचे कृषीमंत्री होते. त्यांना कृषी विधेयकामध्ये काही दुरुस्त्या सुचवायच्या असत्या, तर त्यांनी राज्यसभेत बोलणं गरजेचं होतं. शेतकरी हिताच्या दुरुस्त्या नक्कीच सरकारनं स्वीकारल्या असत्या. पण शरद पवार यांच्यासारख्या माजी कृषीमंत्री आणि ज्येष्ठ नेत्यानं केवळ विरोधासाठी विरोध करणे सामान्य शेतकऱ्याला पटलेले नाही, असा घणाघात विनोद तावडेंनी यावेळी केली.