मुंबई : मराठा आरक्षणाचा निर्णय आणखी 4 आठवडे लांबणीवर पडला आहे. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया केव्हा आणि कशी सुरु होईल, याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे अकरावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून येत्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून अकरावीचे ऑनलाईन वर्ग सुरु केले जाणार आहेत.
अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अभ्यासाचा येत्या आठवड्यात सुरु करण्याचा विचार सुरु आहे, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद( एससीईआरटी)चे संचालक दिनकर पाटील यांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या लांबणीवर पडलेल्या प्रवेश प्रक्रियेमुळे अकरावीचे शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार ? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होते. दरम्यान या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाला दिलासा मिळावा आणि विद्यार्थ्यांना हव्या त्या शाखेचा अभ्यास सुरु करता यावा याकरिता प्रवेशाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत अकरावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमांद्वारे शिक्षण देण्यात येईल, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
या माध्यमातून विशेषतः विज्ञान, वाणिज्य, कला या शाखांमधील सर्वाधिक घेण्यात येणारे विषय किंवा बंधनकारक असलेल्या विषयांच्या तासिका ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच या ऑनलाईन तासिका कोणत्या व्यासपीठावर , कशा आणि किती वेळासाठी उपलब्ध होतील यासंदर्भातील अधिक माहिती लवकरच देण्यात येईल, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले.