मुंबई : राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जुलै ते ऑक्टोबर 2020 या कालावधीतील वाढीव मोबदला देण्यासाठी 57.76 कोटी रुपये वितरित करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाने आज जी.आर जारी केला आहे. यात राज्यातील सुमारे 70 हजार आशा भगिनींना वाढीव मोबदल्याचा लाभ मिळणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत. ग्रामीण आरोग्याचा त्या कणा आहेत. त्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय दिनांक 25 जून 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयामुसाकर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना 1 जुलै 20200 पासून प्रत्येकी 2000 ते 3000 रुपये इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जुलै ते मार्च 2020 या कालावधीतील वाढीव मोबदला देण्यास पावसाळी अधिवेशनात विधिमंडळाने मंजुरी दिली आहे. या अनुषंगाने वित्त व नियोजन विभागाने जुलै ते ऑक्टोबर या कालावधीचे 57.56 कोटीच्या अनुदान वितरणास मान्यता दिली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका योजनेची अंमलबजावणी सुरु असून राज्यात ग्रामीण आणि शहरी भागात मिळून 66 हजारांहून अधिक आशा स्वयंसेविका तर 4 हजार गटप्रवर्तक काम करत आहेत. आशा स्वयंसेविका योजनेमुळे राज्यातील नवजात बालकांचे मृत्यू, बालमृत्यू व माता मृत्यू कमी करण्यात मोलाची मदत मिळाली आहे.