बार्शी : कोरोना महामारीमुळे निवडणूक होऊ न शकल्यानेे मुदत संपत आलेल्या तालुक्यातील 91 ग्रामपंचायतीवर मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी प्रशासकाची नियुक्ती केली आहे.
सर्व प्रशासक हे कर्मचारी वर्गातील असून विस्तार अधिकारी(पंचायत), (सांख्यिकी),(कृषी), केंद्रप्रमुख, जि.प. शाळांचे मुख्याध्यापक, कृषी अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका आदींचा त्यात समावेश आहे. येत्या 10 ते 18 नोव्हेंबरपर्यंत या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपत आहे. या प्रशासकांना ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार सरपंचांचे सर्व अधिकार प्राप्त होणार आहेत.
सन 2015 मध्ये सार्वत्रिक निवडणुका झालेल्या या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ नोव्हेंबर 2020 मध्ये संपत आहे. तत्पूर्वी या ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या निवडणूका होणे अपेक्षित होते. मात्र मध्यंतरी कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने सर्वच निवडणूकांना स्थगिती दिली होती. त्यामुळे या निवडणुका होऊ शकल्या नाहीत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान या ग्रामपंचायतींवर कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्याचा घाट महाविकास आघाडी सरकारने घातला होता. मात्र सरपंच संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेवून तो उधळून लावला. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या, राज्य शासनाच्या कर्मचार्यांना प्रशासकपदी नियुक्त करण्यात आले आहे.
बार्शी तालुक्यातील पानगाव, कोरफळे, श्रीपतपिंपरी, बावी, भालगाव, मळेगाव, चिखर्डे, गौडगाव, सावरगाव, उपळाई(ठोंगे), कांदलगाव, मालवंडी, रातंजन, काटेगाव, तडवळे, तांदूळवाडी, उपळे(दु.), आगळगाव, गुळपोळी, गोरमाळे, घाणेगाव, कुसळंब, कोरेगाव, खामगाव, खांडगाव, महागाव, पांगरी, शेंद्री आदी गावांचा प्रशासक नियुक्तीमध्ये समावेश आहे.