मुंबई : विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्यांत दीड लाखाची मते घेऊन नांदेडमध्ये खळबळ माजवणारे यशपाल भिंगेंना संधी दिल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं यशपाल भिंगे यांना साहित्य क्षेत्रातून संधी दिली आहे. याद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसनं एकाच दगडात वंचित बहुजन आघाडी आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे, राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे आणि यशपाल भिंगे यांची नावे सुचवली आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून 2019 ची लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या यशपाल भिंगे यांच्या नावाची शिफारस विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांसाठी करुन राष्ट्रवादी काँग्रेसनं एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. यशपाल भिंगे यांच्या रुपात वंचितचा एक नेता राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे. तर, यशपाल भिंगे यांना धनगर समाजाच्या प्रश्नांची जाण असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भाजपनं धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेवर संधी देत आमदार बनवले आहे. यशपाल भिंगे यांच्या रुपात राष्ट्रवादी काँग्रेसनही धनगर समाजाची पार्श्वभूमी असणारा नेता विधान परिषदेत पाठवला आहे. एकेकाळी वंचितमध्ये एकत्र असणारे हे दोन्ही नेते विधानपरिषेत एकमेकांच्या विरोधी बाकांवर पाहायला मिळतील.
राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे यांना सहकार आणि समाजसेवा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना सहकार आणि सेवा, गायक आनंद शिंदे यांना कला क्षेत्रातून संधी दिली आहे.
यशपाल भिंगे हे मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत. ते नांदेड मंधील मौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. यशपाल भिंगे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून 2019 ची निवडणूक नांदेडमधून लढवली होती. या निवडणुकीत यशपाल भिंगे यांनी दीड लाखांपेक्षा जास्त मतं मिळवली. या निवडणुकीत अशोक चव्हाण यांना पराभव स्वीकारावा लागला होता.