पाटणा : बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. भाजप-जेडीयू यांची एनडीए बिहारमध्ये मुसंडी मारताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलानुसार शिवसेनेची कामगिरी समाधानकारक नसल्याचं चित्र आहे. 23 पैकी 21 जागांवर तर शिवसेनेच्या वाट्याला ‘नोटा’पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात शिवसेना हिरीरीने उतरली होती. मात्र सेनेला मतदारांनी नाकारल्याचे दिसत आहे. कारण शिवसेनेच्या ‘तुतारी वाजवणारा मावळा’ या चिन्हासमोरील बटणापेक्षा मतदारांनी ‘नोटा’चे बटण अधिक दाबले आहे. शिवसेनेच्या उमेदवारांना o.o4 टक्के मतं मिळाल्याचं सुरुवातीच्या मतमोजणीत दिसत होतं.
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार दुपारी 1.45 वाजेपर्यंत आलेल्या निकालाच्या कलांनुसार शिवसेनेला 23 पैकी 21 जागांवर ‘नोटा’पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. शिवसेनेने 50 उमेदवार देण्याची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात 23 जागांवरच निवडणूक लढवली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विशेष म्हणजे राजदचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेल्या तेजस्वी यादव यांच्या राघोपूर मतदारसंघातही शिवसेना डेंजर झोनमध्ये आहे. म्हणजेच शिवसेनेच्या बहुतांश उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेनेला आधी बिस्कीट हे चिन्ह दिले होते. त्यावर शिवसेनेने तीव्र नापसंती व्यक्त करत चिन्ह बदलून द्यावं अशी मागणी केली होती. ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, गॅस सिलेंडर आणि बॅट या तीन चिन्हांपैकी एक चिन्ह देण्यात यावे, असे शिवसेनेने निवडणूक आयोगाला सुचवले होते. पण ही तिन्ही चिन्हं आधीच अन्य काही उमेदवारांनी आरक्षित केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्किटाऐवजी तुतारी वाजवणारा मावळा हे निवडणूक चिन्हं बदलून दिलं.
* नितीशकुमारांनी घेतला होता ‘धनुष्यबाण’ वर आक्षेप
नितीश कुमार यांच्या JDU ने शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर आक्षेप घेतला होता. JDU ची निशाणी बाण आहे. शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चाची निशाणी धनुष्यबाण असल्याने मतदारांचा गोंधळ होतो असा JDU चा आक्षेपचा मुद्दा होता. निवडणूक आयोगाने JDU चा आक्षेप ग्राह्य मानत शिवसेनेला धनुष्य बाण चिन्हावर निवडणूक लढवता येणार नाही, असे कळवले होते. त्यानुसार सेनेला ‘तुतारी वाजवणारा मावळा’ हे चिन्हं मिळालं आहे. पण बिहाराने या तुतारीस नाकारले आहे.