लातूर : लातूर जिल्हा परिषदेने अनोखा ठराव सर्वसाधारण सभेत घेतला आहे. जो कर्मचारी आई-वडिलांचा सांभाळ करीत नाही, त्याच्या पगारातून 30 टक्के रक्कम ही आई-वडिलांना उदरनिर्वाहसाठी मिळणार आहे. या ठरावाची आता राज्यभर चर्चा होत आहे.
मातापित्यांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतनातील 30% वेतन मातापित्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय लातूर जिल्हा परिषदेने घेतला आहे.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी वृद्ध मातापित्यांच्या बाबतीत घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. लातूर जिल्हा परिषदेचा हा निर्णय क्रांतीकारी असल्याचे मत सामाजिक क्षेत्रांतून व्यक्त होत आहे.
अनेकदा मुलांना वृद्धपकाळात असलेल्या आई -वडिलांच्या कष्टचा विसर पडतो. अनेकांना नीटनेटकी वागणूकही मिळत नाही. परिणामी मुलगा शासकीय नोकरदार असताना त्यांना वृद्धपकाळात आश्रमात दिवस काढावे लागतात. यावर जालीम पर्याय म्हणून लातूर जिल्हा परिषदेने एक ठराव मंजूर केला आहे. जो कर्मचारी आई-वडिलांचा सांभाळ करीत नाही त्यांच्या पगारातील 30 टक्के रक्कम ही थेट आई-वडिलांच्या खात्यांमध्ये वर्ग केली जाणार आहे. हा अनोखा मुद्दा मंचकराव पाटील यांनी उपस्थित केला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
लातूर जिल्हा परिषदेमध्ये जवळपास साडेबारा हजार कर्मचारी कार्यरत असून एकूण 14 विभाग आहेत. या सर्व विभागांतर्गत कार्यरत अधिकारी-कर्मचारी हे जर आपल्या वृद्ध आई वडिलांना सांभाळत नसतील तर त्यांच्या एकूण पगाराच्या 30 % रक्कम ही संबंधितांच्या आई वडिलांच्या खात्यात जमा करावी असा ठराव आजच्या सर्वसाधारण सभेत सर्वसंमतीने पारित करण्यात आला. मंचकराव पाटील यानी ठराव माण्डला तर रामचंद्र तिरुके यानी अनुमोदन दिले आणि जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी तो मंजूर केला. समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम,सामान्य प्रशासन आदींसह विविध विभागातील विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
या सर्वसाधारण सभेला अध्यक्ष मा. राहुल केंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपाध्यक्षा भारतबाई सोळंके, कृषी सभापती गोविंदराव चिलकुरे, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई राठोड, बांधकाम सभापती संगीताताई घुले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव यांच्यासह सर्व विभागप्रमुख, सर्व सदस्य उपस्थित होते.