सांगली : कोरोनामुळे बंद असलेली मंदिरं खुले करण्यात आले आहे. मात्र, सांगलीमध्ये चप्पल घालून मंदिरात गेल्याच्या कारणावरून आटपाडी तालुक्यातील मासाळवाडी इथं दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. धक्कादायक म्हणजे, या प्रकरणात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावासह 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या 12 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मानंद पडळकर यांचा समावेश आहे. दरम्यान, ब्रह्मानंद पडळकर यांनी या घटनेशी आपला कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे सांगितले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आटपाडी तालुक्यातील मासाळवाडी गावात काल मंगळवारी दुपारी गावातील महालिंगराय मंदिरात ही घटना घडली, असे वृत्त आहे. या प्रकरणी शांताबाई मारुती मासाळ (वय 60) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार गोपीचंद पडळकर यांचा भाऊ ब्रम्हानंद पडळकर हे दुपारी आपल्या मित्रांसह मासाळवाडी येथील मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मंदिरं सुरू करण्यात आल्यामुळे मंदिराच्या परिसरात साफ-स्वच्छता करण्यात आली होती. पण, ब्रम्हानंद आणि त्यांचे मित्र चपला घालून मंदिरात गेले होते. ही बाब स्थानिक लोकांच्या लक्षात आली.
स्थानिकांनी ब्रम्हानंद पडळकर आणि त्यांच्या मित्रांना चपला बाहेर काढून मंदिरात जाण्याची विनंती केली. पण, यावरून दोन्ही गटामुळे वादाला सुरुवात झाली. चपला बाहेर काढण्यावरून दोन्ही गटामध्ये बाचाबाची झाली. काही वेळाने बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले, दोन्ही गटामध्ये रस्त्यावरच तुफान हाणामारी झाली. या धुमश्चक्रीत गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली. त्यामुळे गावात एकच गोंधळ उडाला होता.
या प्रकरणी आटपाडी गावात राहणाऱ्या शांताबाई मारुती मासाळ यांनी आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या घटनेत मंगळसूत्र आणि मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या गाडीतील 82 हजार लांबवण्याचे या तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या तक्रारीवरून ब्रह्मानंद पडळकर, गणेश भुते नवनाथ मारुती सरगर, अनिल सूर्यवंशी, विठ्ठल पाटील आणि सत्यजीत पाटील या सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.