पंढरपूर : कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा उद्या गुरुवारी कडक संचारबंदीत साजरा होत आहे. मात्र या सोहळ्यात भाविकांची गर्दी नसल्याने येथे निरव शांतता दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. परंपरा जपण्यासाठी कार्तिकी यात्रा सोहळा प्रतिकात्मक व मर्यादित स्वरुपात साजरा होत आहे.
उद्या पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवार व मानाचे वारकरी कवडूजी भोयर (वर्धा, हिंगणघाट) यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न होत आहे. दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या पंढरीत श्री विठ्ठल रुक्मिणीची कार्तिकी वारी सोहळा सुरु आहे. उद्या गुरुवारी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा होणार आहे. तर मानाचे वारकरी देखील महापूजेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे केवळ गाभार्यात ८ जणांना प्रवेश मिळणार आहे. तर शासकीय महापूजेवेळी मंदिरात, सोळखांबी येथे २० ते २५ लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगीतले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून दक्षता घेत यंदाचा कार्तिकी यात्रा सोहळा केवळ परंपरा जपण्यासाठीच मर्यादित स्वरुपात साजरा करण्यात येत आहे. भाविकांनी पंढरपूरला न येता घरीच राहून कार्तिकी वारी साजरी करावी. ऐरव्ही वारीला राज्यभरातून येणार्या लाखो वारकर्यांनी पंढरी नगरी गजबजून गेलेली असते. मात्र, यंदा कार्तिकी वारी कोरोनाचा संसर्ग वाढू नये. म्हणून गावोगावी नगरिकांनी एकत्रित येत साजरी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न होत आहे. महापूजेनंतर उपमुख्यमंत्री पवार यांचा सत्कार मंदिर समितीकडून करण्यात येणार आहे. या अनुषंगाने पूजेसाठी व सत्कारासाठी उपस्थित राहणारे मंदिर समितीचे सहअध्यक्ष, सदस्य, अधिकारी व कर्मचारी व मंदिराशी संबंधित इतर असा ११३ जणांची कोरोना टेस्ट घेण्यात आलेली आहे. सर्व कर्मचार्यांची टेस्ट निगेटिव्ह आल्याने एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे.