अमरावती : महावितरणने दर्यापूर तालुक्यातील लेहेगाव रेल्वे येथील रहिवासी असलेल्या मजूर दाम्पत्याला ५१ हजार १४० रुपयांचे वीज बिल दिले आहे. दारिद्र्यरेषेखालील या कुटुंबाचा अवघ्या तीन सीएफएल बल्बचा वीजवापर आहे. कोरोनाकाळातील हे अव्वाच्या सव्वा बिल भरायचे कसे, या विचारांनीच त्यांचा हात-पाय गळाले असून घाबरून गेले आहेत.
कोरोनाकाळातील अवाढव्य वीज बिल माफ होणार, असे सांगितले जात होते. मात्र, त्या भूमिकेपासून फारकत घेत खुद्द वीजमंत्र्यांनी लोकांना बिलाच्या माफीबाबत तूर्तास कोणतीही भूमिका घेणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे वीज बिल भरावेच लागणार हे स्पष्ट आहे. मात्र, त्यासाठी घर गहाण ठेवायचे का, असा प्रश्न मालखेडे यांनी उपस्थित केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सुखदेवराव मालखेडे (६५) असे त्या मजूराचे नाव आहे. भूमिहीन असलेले सुखदेवराव हे मजुरी करतात. गावात मिळालेल्या तीन खोल्यांच्या घरकुलात ते पत्नीसह वास्तव्यास आहेत. त्यांच्याक़डे विजेच्या उपकरणाच्या नावावर तीन सीएफएल बल्ब आहेत. तेदेखील दिवसा बंद असतात आणि रात्रीदेखील निद्राधीन होण्यापूर्वी बंद केले जातात.
यावरून त्यांचा वीजवापर हा केवढा असेल, याची कल्पना यावी. सुखदेवरावांनी शेवटचे वीज बिल लॉकडाऊनपूर्वी १६०० रुपये भरले होते. त्यानुसार काही हजारांपर्यंत बिल अपेक्षित असताना, महावितरणने ५१ हजारांवर बिल देऊन त्यांना ‘हायव्होल्टेज’ धक्का दिला आहे. त्यांच्या वीज मीटरचे आकडे महावितरण कर्मचाऱ्यांनी घेतले नाही. अद्ययावत मोबाईल नसल्याने महावितरणच्या आवाहनानुसार वीज मीटरचे छायाचित्र पाठविता आले नाही. आता आलेले अवाढव्य बिल आवाक्याबाहेरचे आहे.