पुणे : पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून विकसित करण्यात येत असलेली ‘कोव्हिशिल्ड’ ही लस कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 90 टक्के प्रभावी ठरत असल्याचं सांगण्यात येत आहे. ही माहिती खुद्द सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी दिली आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पण मराठा क्रांती ठोक मोर्चा अडवणार असल्याचे सांगितले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना लसीच्या प्रगतीसंबंधी माहिती घेण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोविड लस तयार करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी 28 नोव्हेंबरला पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार. कोरोना लसीच्या निर्मितीची प्रक्रिया कुठपर्यंत आली, याचा आढावा घेणार याबाबत प्रशासनाची बैठक झाली आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सौरभ राव यांची भेट घेत दौऱ्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती दिली.
दरम्यान, पुणे दौऱ्यावर येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मार्ग मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने अडवण्याचा एल्गार करण्यात आला आहे. मराठा आरक्षणावर राज्य सरकार आणि केंद्र सरकार दखल घेत नसल्याचा आरोप करत मराठा क्रांती ठोके मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी ही घोषणा केली.
“मराठा समाजाला ना राज्याच्या सुविधा मिळत आहेत, ना केंद्राच्या. मराठा विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय कधीपर्यंत सहन करणार? शासकीय सेवेत आणि शिक्षणात मराठा समाजाला डावलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना लसीचा आढावा घेण्यासाठी पुण्यात येत आहेत. त्यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या व्यथा समजून घ्याव्यात, मराठा समाजाचा आढावा घ्यावा, म्हणून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने पुण्यात मोदींचा मार्ग अडवून भेट घेणार आहोत”
आबासाहेब पाटील – समन्वयक