पंढरपूर : पंढरपूर – मंगळवेढा शहरातील नागरिकांच्या मनावर आधी राज्य केलेल्या लोक नेते आ. भारत भालके यांच्या अंत्यदर्शनासाठी शिवतीर्थावर शोकाकुल वातावरणात अलोट असा जनसागर लोटला होता. मागील विधानसभा मध्ये विजय मिळाला ज्या शिवतीर्थावर शड्डू ठोकून भारत भालके यांनी नागरिकांना अभिवादन केले होते.
त्यांचं शिवतीर्थावर आमदार भालके यांचे अंतिम दर्शन घेण्याची वेळ पंढरीतील नागरिकांवर आली. आमदार भारत भालके यांचे काल रात्री निधन झाले आहे. त्यांचे पार्थिव शरीर २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:३५ वाजता पुणे येथून सरकोली (ता. पंढरपूर) मार्गस्थ करण्यात आले.
दरम्यान टेंभुर्णी मार्गे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखानावर (गुरसाळे, ता. पंढरपूर) व पंढरपूर शहरातील शिव तीर्थावर भालकेंची पार्थिव असलेली रुग्णवाहिका आणण्यात आली. यावेळी पंढरपुरातील नागरिकांनी आ. भालके यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. त्यानंतर भालके यांचे पार्थिव पंढरपूर येथील नगर प्रदक्षिणा मार्गावरून मंगळवेढाकडे मार्गस्थ झाले आहे.
दुपारी १:३० च्या सुमारास सरकोली येथे त्यांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी सर्वांसाठी ठेवण्यात येणार आहे. सरकोली येथेच त्यांच्यावरच सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आमदार भारत भालके यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री धनंजय मुंडे, महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आ. बबनदादा शिंदे, आ. यशवंत माने, माजी आ. राजन पाटील याच बरोबर शिवसेनेचे मंत्री व आमदार येणार आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारतनाना भालके यांच्या निधनाची बातमी अत्यंत क्लेशदायक असून सामान्य जनतेशी घट्ट नाळ असलेला, मतदारसंघाच्या विकासासाठी तळमळीनं झटणारा लोकनेता आज हरपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं चांगला लोकप्रतिनिधी, मी निकटचा सहकारी गमावला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतनाना भालके यांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, भारतनानांचं नेतृत्वं हे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील जनतेच्या सुख-दु:खांशी एकरुप झालेलं नेतृत्वं होतं.