अहमदनगर : दोन मजली गोठा कधी पाहिलाय, ऐकलंय का, नाही ना तर अहमदनगरमध्ये एका युवतीने दोन मजली गोठा बांधून तब्बल 60 म्हशींचा सांभाळ करतीय. आजही समाजात अनेक ठिकाणी कुटुंबात मुलीला दुय्यम स्थान दिलं जातं आणि मुलाला कुटुंबप्रमुख म्हणून पुढं आणलं जातं. कारण मुलाची कर्तबगारी सर्वमान्य आहे. ही समजूत श्रद्धाने खोडून टाकलीय. वाचा सविस्तर श्रद्धा ढवणची कामगिरी.
अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील युवतीने स्वतःचे शिक्षण सुरू ठेवत 1 नाही 2 नाही तर तब्बल 60 म्हशींचा सांभाळ करून कुटुंबाला हातभार लावला आहे. श्रद्धा ढवण असं या तरुणीचं नाव आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील निघोज येथे राहणारी श्रद्धा मुलीकादेवी महाविद्यालयात श्रद्धा TYBSc मध्ये शिक्षण घेत आहे.
कुटुंबामध्ये मुलगा हा घरातील जबाबदारी अंगावर घेतो. असं असलं तरी आता हा पायंडा मोडत आहे आणि मुली देखील समर्थपणे घराची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन यशस्वीरीत्या घराचा गाडा हाकत आहे. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे श्रद्धा ढवण आहे. तिने आत्मनिर्भर बनून एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* कुटुंबाचा सर्व भार श्रद्धावर
श्रद्धाचे वडील दिव्यांग, लहान बहीण पुण्यात शिक्षण घेत आहे तर भाऊ दहावीत शिकत आहे. त्यामुळे कुटुंबाचा सगळा भार श्रद्धा आणि तिच्या आईवर आला. त्यामुळे घरी असलेल्या 4 म्हशींचा सुरुवातीला श्रद्धाने सांभाळ केला. आणि हळूहळू तब्बल 60 म्हशींचा सांभाळ करत श्रद्धा आत्मनिर्भर बनली. घराजवळच तिने या म्हशींसाठी 2 मजली गोठा देखील बांधला. म्हशींसाठी 2 मजली गोठा जिल्ह्यात पहिलाच उपक्रम आहे.
* श्रद्धाचा रोजचा दिनक्रम
पहाटे लवकर उठून स्वतः चे आवरणे आणि त्यानंतर मग गोठा, म्हशी धुणे, दूध काढणे, दूध काढल्यावर स्वतः ते दूध डेअरीवर नेऊन घालणे हे कामे श्रद्धा करते. इतकेच नाही तर म्हशींसाठी पेंड किंवा म्हशीचे खाद्य घेऊन येणे आणि म्हशीला खाऊ घालणे ही सर्व कामे करून संध्याकाळी अभ्यास करणे असा श्रद्धाचा रोजचा दिनक्रम आहे. स्वतःचे शिक्षण करून घराला हातभार लावत असल्याने श्रद्धाच्या आईला देखील तिचा अभिमान वाटतो. इतकेच नाही तर गावातील लोक देखील श्रद्धाचे कौतुक करत आहेत.