मुंबई : लिफ्टमधून बाहेर येत असतानाच दरवाजात अडकून खाली पडल्याने गंभीररित्या जखमी होऊन एका ५ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना धारावीतील पालवाडी येथे घडली आहे. या दुर्घटनेमुळे लिफ्टच्या सुरक्षिततेचा प्रश्नही पुन्हा ऐरणीवर आला आहे.
याप्रकरणी शाहू नगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असून त्यात संशयास्पद असे काहीही आढळलेले नाही. लिफ्टमध्ये मुलांना एकटे सोडू नये तसेच लिफ्टमनशिवाय लिफ्टचा वापर करू नये, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गंगावणे यांनी केले आहे.
धारावी क्रॉस रोडवरील पालवाडी येथील कोझी शेल्डर बिल्डिंगमध्ये काल शनिवारी दुपारी १२.४५ वाजता ही घटना घडली. या घटनेत मृत पावलेल्या मुलाचे नाव मोहम्मद हुजेईफा सर्फराज शेख असे आहे. ही बिल्डिंग सात मजली असून चौथ्या मजल्यावर शेख कुटुंब वास्तव्याला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* अशी घडली दुर्दैवी घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोझी शेल्टर बिल्डिंगमधील रूम नं.४०२ मध्ये राहणारा मोहम्मद हुजेईफा सर्फराज शेख हा मुलगा त्याची ७ वर्षांची मोठी बहीण व ३ वर्षांची लहान बहीण यांच्यासोबत तळमजल्यावरून बिल्डिंगच्या लिफ्टमधून घरी चालले होते. लिफ्ट चौथ्या मजल्यावर पोहचल्यानंतर त्याच्या दोन्ही बहिणी लिफ्टचा लोखंडी दरवाजा सरकवून व बाहेरील लाकडी सेफ्टी दरवाजा उघडून बाहेर गेल्या. त्यानंतर हुजेईफा हा बाहेर जात असतानाच दुर्घटना घडली. लिफ्टचा लोखंडी दरवाजा बंद करत असताना त्याला लगेच पुढे जाता आले नाही आणि लाकडी सेफ्टी दरवाजा बंद होऊन लिफ्ट सुरू झाली. त्यामुळे हा मुलगा लिफ्टचा लोखंडी दरवाजा आणि लाकडी दरवाजा यामध्ये अडकला व लिफ्ट वर जाताच खाली मोकळ्या जागेत कोसळला. या दुर्घटनेत गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज फारच धक्कादायक असून लिफ्टच्या सुरक्षिततेचा प्रश्नही त्यामुळे ऐरणीवर आला आहे.