सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचा धडाडीचा कार्यकर्ता आणि माझा जवळचा सहकारी गमावल्याचं दुःख आहे. त्यांचं अपूर्ण राहिलेलं मतदारसंघातील कार्य पूर्ण करण्याचा मी शब्द देतो,’ अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. मात्र पुढच्या वारसाबाबतही अजित पवारांनी सूचक विधान केले आहे.
आमदार भारत भालकेंची अपूर्ण कामे थोरल्या पवारसाहेबांनी व उपमुख्यमंत्री अजितदादांनी पूर्ण करावीत. त्यांचे पुत्र भगिरथ भालकेंना आमदार भालकेंच्या रुपात बघून यापुढे सहकार्य करावे, असे व्यक्तव्य कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडीक यांनी शोकसभेत केले. महाडीक यांच्या भाषणातील मुद्द्याचा धागा पकडून अजित पवार यांनी “मी बोलत नाही, तर करुन दाखवतो,’ असं आमदार भालकेंच्या वारसदाराबाबत सूचक व्यक्त केलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, आमदार भारत भालके यांच्या वारसदाराबाबत माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या व्यक्तव्यासंदर्भात अजित पवार म्हणाले की, ही बोलण्याची वेळ नाही. मी बोलत नाही तर वेळ आल्यावर करून दाखवतो,’ असे सांगून भालके यांच्या वारसदाराबाबत सूचक विधान केले.
या वेळी आमदार प्रशांत परिचारक, आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे, आमदार संजय शिंदे, यशवंत माने, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, दामाजी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनीही श्रद्धांजली वाहिली.
* पालकत्व स्वीकारल्याचे जाहीर
आमदार भालके यांच्या पार्थिवावर सरकोली येथे काल शनिवारी दुपारी चारच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी झालेल्या शोकसभेत बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आपण पालकत्व स्वीकारत असल्याचेही जाहीर केले.
पवार म्हणाले की, शरद पवारांना दैवत मानून काम करताना आमदार भालकेंना मतदारसंघातील जनतेनी ताकद दिली. जनतेशी नाळ जोडलेले ते लोकनेता होते. एखाद्या कामाबाबत पाठपुरावा करताना “मला माहीत नाही, हे काम झालेच पाहिजे’ ही भूमिका घेत कामाचा शेवट यशस्वी होईपर्यंत पाठपुरावा करणारे ते नेते होते. भालके कुटुंबाला सावरण्यासाठी पांडुरंग आणि रुक्मिणीने ताकद द्यावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.