मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना जाहीर झालेल्या ग्लोबल टीचर पुरस्कारानंतर त्यांच्यावर महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही रणजीतसिंह डिसले यांच्या कार्याचं कौतुक करत त्यांचं अभिनंदन केलं आहे.
सोलापूरच्या परितेवाडी शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांनी भारताचा झेंडा जगात फडकावला. युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार त्यांनी पटकावला. सात कोटी रुपयांचा हा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्राच नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामांची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“युनेस्को आणि लंडनच्या वार्की फाऊंडेशनकडून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले ह्यांना मिळाला. रणजितसिंह तुमचं मनापासून अभिनंदन! तमाम महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतोय”, असं लिहित राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे डिसले यांचे कौतुक केले.
विशेष म्हणजे, पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम डिसले यांनी अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे ९ देशांमधील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले यांना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंडाकरीता वापरणार आहेत.