मुंबई : साईबाबांच्या दर्शनासाठी काही तरुण मुंबईवरून शिर्डीला दर्शनासाठी निघाले. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. तरुण मुलांसोबत घडलेल्या घटनेनंतर कुटुंबियांमध्ये व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
साईबाबांच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच
विलेपार्ले, मुंबई येथून नीलेश नंदकिशोर धावडे (वय २२), सिद्धार्थ भगवान भालेराव (वय २२), वैजनाथ जालिंदर चव्हाण (वय २१), आशिष महादेव पाटोळे (वय १९) व अनिश अरुण वाकळे (वय १७) यांच्यासह अन्य काही मित्र शनिवारी (ता. २) मध्यरात्री पाऊणच्या सुमारास दुचाकीवरून शिर्डीकडे जात होते. यापैकी नीलेश आणि सिद्धार्थ एका दुचाकीवर, तर आशिष, अनिश व वैजनाथ हे अन्य दुचाकीद्वारे जात होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
लेखानगर भागात उड्डाणपुलावर वैजनाथ यांच्या दुचाकीला एका गाडीचा धक्का लागल्याने दोघे खाली पडले. त्याचवेळी मागून येत असलेल्या ट्रकचा वेग नियंत्रित न झाल्याने चौघे या ट्रकखाली आले. या अपघातात चौघेही गंभीर जखमी झाले होते. या ठिकाणाहून जाणाऱ्या काही जणांच्या मदतीने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी वैजनाथ, सिद्धार्थ व आशिष यांना मृत घोषित केले. तर अनिशवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबईहून शिर्डीकडे जात असलेल्या युवकांच्या दुचाकीला लेखानगर परिसरात उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले असून, एक तरुण गंभीर जखमी आहे. या प्रकरणी नीलेश धावडे यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक राकेश शेवाळे तपास करीत आहेत.