नवी दिल्ली : देशभरात आज लसीकरणाची ड्राय रन पार पडतेय. आता राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादवांचे मोठे सुपुत्र आणि माजी आरोग्यमंत्री तेजप्रताप यादवांनी लसीकरणावरून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. ‘कोरोना लस प्रथम मोदींना देण्यात यावी. मग आम्ही घेऊ’, असं तेजप्रताप म्हणाले. तर, ‘रशिया- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पहिले लस घेतली. त्याचप्रमाणे भारतात मोदींनी पहिले लस घ्यावी’, असं काँग्रेस नेते अजित शर्मांनी म्हटलं.
काही दिवसांपूर्वी भारतानं सीरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेकच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या आपात्कालीन वापरास परवानगी दिली. परंतु त्यानंतर लसींवरूनही देशात राजकारणाला सुरूवात झाली आहे. यापूर्वी लसीच्या किती सुरक्षिततेबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. दरम्यान, आता राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे मोठे सुपुत्र आणि माजी आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव यांनी लसीकरणावरून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोना प्रतिबंधात्मक लसीवर यापूर्वी मुलायम सिंह यादव यांचे सुपुत्र आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. आता तेजप्रताप यादव यांनीदेखील त्यांच्या सूरात सूळ मिसळला आहे. “कोरोनाची जी लस आली आहे ती सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात यावी. त्यानंतर आम्ही ती लस घेऊ,” असं तेजप्रताप यादव म्हणाले.
कोरोनाच्या लसीवरून बिहारच्या नेत्यांनीही टीका करण्यास सुरूवात केली आहे. “ज्या प्रमाणे रशिया आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पहिले लस घेतली, त्याचप्रमाणे भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिले लस घ्यावी,” अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते अजित शर्मा यांनी दिली. त्यांच्या या वक्तव्यांनंतर राजकारण तापू लागलं आहे. तर दुसरीकडे जदयूनं राजद आणि काँग्रेसच्या वक्तव्यांचाही समाचार घेतला आहे. “काँग्रेसचं जर स्वदेशीवर काही प्रश्नचिन्ह असेल तर राहुल गांधी आपल्या परदेश दौऱ्यावरच आहेत. अशात त्यांनी परदेशातूनही लस घेऊन भारतात यावं,” असं म्हणत जदयूचे प्रवक्ते राजीव रंजन यांनी काँग्रेसवर टीका केली.