कुर्डूवाडी : चोरी, दरोडा, बॅग लिफ्टिंगसारख्या अनेक गुन्ह्यात वॉन्टेड असलेला आरोपी शंकर गुंजाळ पकडण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक बारलोणी (ता. माढा) या गावात दाखल झाले असता जमावाने पोलिसांवरच दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. जमावाच्या हल्ल्यात गुन्हे शाखेचे तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
पोलिसांचं पथक गावात पोहोचताच 25 ते 30 जणांनी दगडफेक करीत आरोपीला सोडवल्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे मोठा फौजफाटा घेऊन पुन्हा आरोपींना पकडण्यासाठी बारलोणी येथे दाखल झाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पथक सकाळी बारलोनी गावच्या हद्दीत तपासाच्या दिशेने पोहचले होते. तिथे पोलीस पथक आल्याचे पाहून संबंधित आरोपींनी त्यांच्या सरकारी पोलीस गाडीवर हल्ला चढवित दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत पथकातील तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हल्ला झाला तरी कुर्डूवाडी पोलिसांना याचा थांगपत्ताही लागला नव्हता. वरिष्ठांकडून माहिती मिळाल्यानंतर येथील पोलिसांनी धावपळ सुरू केली. तोपर्यंत सोलापूर ग्रामीण पोलिसांचे अधिकची पथके पुढील कारवाईसाठी बारलोनी गावात दाखल झाले.
घटनास्थळी करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी भेट दिली असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. गावात तणावपूर्ण शांतता पसरल्याचं चित्र आहे.