माढा : माढ्यातील न्यायालयाच्या इमारतीच्या पाठीमागील घरात सुमारे साडेसात लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व १० हजार किमतींचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना आज शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अमृता प्रशांत जगताप यांनी माढा पोलिसात फिर्याद दिली आहे. अमरदीप भांगे हे बेडरूममध्ये झोपले होते तर त्यांची पत्नी व मुलगी नातवासह हाॅलमध्ये झोपले होते. घराच्या जिन्यातून आवाज आल्याने फिर्यादी अमृता व त्यांची आई अश्विनी तसेच मुलगा प्रशांत हे जागे झाले, त्यावेळी डोळे उघडून पाहिले असता समोर चार इसम दिसले. घाबरून गेलेल्या अमृता व कुटुंबीयांना जागेवरून हलू नका असे म्हणत चाकूचा धाक दाखविला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याचवेळी घरातील कपाटात ठेवलेल्या चार तोळे पाटल्या, पाच तोळ्याचे गंठण , चार तोळे बांगड्या, पाच तोळे लॉकेट, दोन तोळ्याचे मिनी गंठण, कर्णफुले, एक ग्रॅम व दोन ग्रॅम बदाम व कळस व एक मोबाईल असा सात लाख ६१ हजार रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमूल कादबाने, पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.