जयपूर : राजस्थानच्या कोटामधील भाजपचे आमदार मदन दिलावर यांनी एक व्हिडिओ शेअर करत दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर टीका केली आहे. सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी विकृत मानसिकतेचे असल्याचं ते म्हणाले. आंदोलनाच्या नावाखाली हे लोक पिकनिक साजरी करत आहेत. तसंच हे तथाकथित शेतकरी बिर्याणी खाऊन बर्ड फ्लू पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, शेतकऱ्यांना दहशतवादी आणि दरोडेखोर असे शब्द वापरणं लाजिरवाणी बाब आहे. ज्या अन्नदात्याने तुमच्यापर्यंत अन्न पोहोचवलं त्यांच्या आंदोलनाला तुम्ही पिकनिक म्हणता. बर्ड फ्लूसाठी त्यांना जबाबदार ठरवत आहात? त्यांचे हे वक्तव्य भाजपाची विचारसरणी दाखवत असल्याचे काँग्रेस नेत्यांकडून टीका होत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भाजप आमदार मदन दिलावर यांचा सुमारे दोन मिनिटांच्या व्हिडिओ आहे. ‘तथाकथित शेतकरी हे आंदोलन करत आहेत. आंदोलन कशासाठी आहेत? जे कायदे शेतकऱ्यांसाठी आणले गेलेत ते रद्द करण्यासाठी. शेतकऱ्यांना कुठलाही लाभ मिळू नये, हा त्याचा हेतू आहे. तथाकथित शेतकरी देशाची चिंता करत नाहीत, देशातील जनतेचीही चिंता नाही, त्यांच्यासाठी आंदोलन काय आहे … ते तर पिकनिकची मजा घेत आहेत,चिकन बिर्याणी खात आहेत, काजू बदाम खात आहेत. ते ऐश्वर्यात आहेत आणि वेष बदलून तिथे येत आहेत. त्यात दहशतवादीही असू शकतात. त्यात दरोडेखोरही असू शकतात. शेतकऱ्यांचे शत्रूही असू शकतात. या सर्वांना देश उद्ध्वस्त करायचा आहे’, असा आरोप भाजप आमदार दिलावर यांनी केला.
‘चिकन बिर्याणी खावून त्यांचा बर्ड फ्लूचा पसरवण्याचा कट आहे ,असं वाटतं. केंद्र सरकारने त्यांना दूर केलं नाही तर ते देशात मोठे आंदोलन घडवू शकतील अशी भीती वाटते. म्हणूनच आंदोलन करणाऱ्यांना एकजूट होण्यापासून रोखलं पाहिजे. रस्त्यावर बसून ते नागरिकांसमोर समस्या निर्माण करत आहेत, असं आमदार मदन दिलावर म्हणाले.