सोलापूर : महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे नगसेवक अमोलबापू शिंदे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी महापौर, पक्षनेते, गटनेते, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारल्यानंतर महापौर दालनात महापौर श्रीकांचना यन्नम यांनी शिंदे यांचा फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत शुभेच्छा दिल्या.
नूतन विरोधी पक्षनेते शिंदे यांना शुभेच्छा देताना महापौर यन्नम म्हणाल्या, महापालिककेतील कारकीर्दीचे हे शेवटचे वर्ष असून सोलापूरच्या विकासासाठी सत्ताधारी व विरोधी पक्ष एकत्र येऊन कार्य केल्यास निश्चित विकास होईल. चुका करणार्या अधिकार्यांवर कारवाईसाठी सर्वजण एकत्र येऊ.
विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांच्या सत्काराप्रसंगी उपस्थित पक्षनेते श्रीनिवास करली यांनी मनोगत व्यक्त करताना शिंदे यांना शुभेच्छा तर दिल्याच, पण याच महिन्यात महापालिकेचे बजेट सभागृहात सादर होणार असून सोलापूरच्या विकासासाठी विरोधी पक्षनेते व गटनेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव यांनी शिंदे यांना शुभेच्छा देताना स्पष्ट केले की, नूतन विरोधी पक्षनेते क्षमतावान असून सोलापूरच्या विकासासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्रित करून ते कार्य करतील. सोलापूरचा पाणीपुरवठा पुरता विस्कळीत झाला असून तो सुरळीत होण्यासाठी एकत्रित काम करू.
वंचित बहुजन आघाडीचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी नूतन विरोधी पक्षनेते शिंदे यांना शुभेच्छा देताना मंगळवेढा तालीम आणि बुधवार पेठेचे तसेच शिंदे-पिसे आणि चंदनशिवे परिवाराचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे सांगितले. यावेळी गटनेते चेतन नरोटे, परिवहन सभापती जय साळुंखे, मंड्या उद्यान सभापती गणेश पुजारी, संकेत पिसे, तुकाराम म्हस्के यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.