मुंबई : मंत्री धनंजय मुंडे प्रकरणात मुंबई पोलीस दलातील आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली, या धनंजय मुंडे प्रकरणावर चर्चा झाल्याचं कळतंय, त्यानंतर नांगरे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीही भेट घेतली आहे. मात्र आयपीएस अधिकाऱ्याच्या या भेटीवर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार टीका केली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी शरद पवारांसोबत चर्चा करायला ते राज्याचे गृहमंत्री आहेत की मुख्यमंत्री? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
त्याचसोबत राज्यात कोणतंही अधिकार पद नसलेल्या शरद पवारांशी चर्चा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी मी कॅबिनेट सचिवांकडे करणार आहे. तसेच पाठीमागून सूत्र हलवण्यापेक्षा घरी बसलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नारळ देऊन शरद पवारांनी स्वत: सत्तेची सूत्रे हाती घ्यावी, असा टोलाही आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली. या आरोपामुळे धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्ष भाजपाकडून केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
खासदार शरद पवार यांनी सांगितले की, धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत, मुंडेंनी माझी भेट घेऊन मला सखोल आणि सविस्तर माहिती सांगितली आहे. ही माहिती पक्षाच्या बैठकीत नेत्यांना सांगितली जाईल त्यानंतर पक्ष म्हणून जो काही निर्णय घ्यायचा असेल तो घेतला जाईल असं पवार म्हणाले. रात्री उशीरा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली, या बैठकीत तर्तास तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा नाही असं ठरलं आहे.
* विश्वास नांगरे – पाटलांची हकालपट्टी करा
गुरुवारी दिवसभर धनंजय मुंडे प्रकरण माध्यमात गाजत असताना विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली, या भेटीत धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र या भेटीवर भाजपा आमदार अतुळ भातखळकरांनी टीका करत पवारांसोबत चर्चा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे.