मुंबई : मुंडे प्रकरणात रोज नवनवीन वळण येत आहेत. या संपूर्ण घटनेत पोलीस सहकार्य करत नाही, असा आरोप तक्रारदार रेणू शर्माच्या वकिलांनी केला होता, धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानं त्यांचे राजकीय जीवन धोक्यात आलं होतं, परंतु भाजपा नेते कृष्णा हेगडे आणि मनसेचे मनिष धुरी यांनी या प्रकरणात उडी घेतल्याने संपूर्ण घडामोडीला उलट कलाटणी मिळाली आहे.
कृष्णा हेगडे यांनी तक्रारदार मुलीवर गंभीर आरोप करत २०१० पासून ही महिला सतत माझ्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करतेय, असा आरोप केल्यानं धनंजय मुंडे यांच्याविरोधात असलेले वातावरण त्यांच्या बाजूने वळलं.
मात्र कृष्णा हेगडे यांना पहिल्यांदा आमदार प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटले होते, त्यांनीच माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, हेगडेंनी केलेले आरोप माझी प्रतिमा मलीन करत धनंजय मुंडे यांच्यावरील गुन्ह्यात अडथळा आणणारे आहेत, कृष्णा हेगडेंचे आरोप बोगस आहेत असा दावा तक्रारदार महिलेने केला, त्यापाठोपाठ आता पुन्हा या प्रकरणात महिलेने तुमची हीच इच्छा असेल तर मी माघार घेते असं ट्विट म्हटलं आहे.
तक्रारदार महिलेने ट्विटमध्ये म्हटलं की, एक काम करा, तुम्ही सगळ्यांनी निर्णय घ्या, काहीही माहिती नसताना जे मला ओळखत नाहीत आणि जे ओळखतात ते चुकीचा आरोप करत आहेत. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवा, मी माघार घेते जी तुमची इच्छा आहे. जर मी चुकीची होती तर हे लोक आतापर्यंत पुढे का आले नाहीत? मी मागे हटली तरी मला माझ्यावर गर्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मी एकटीच अशी मुलगी आहे जी लढतेय. मी कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नाही आणि हे लोक माझ्याविरोधात एकत्र आलेत, तुम्हाला जे हवं ते लिहा असं सांगत रेणु शर्माने ‘देव तुमचं भलं करो’ असं ट्विटमध्ये लिहिलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न
“मी पोलिसांत तक्रार केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्याकडूनच जाणीवपूर्वक माझ्यावर आरोप केले जाऊ लागले आहेत. मी कोणत्याही हनीट्रॅपचा भाग नव्हते. उलटपक्षी कृष्णा हेगडे यांनीच माझ्याशी बोलायला सुरुवात केली होती. ते मला आमदार प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटले होते, हेगडेंचे आरोप बोगस असल्याचं म्हटलं आहे. “कृष्णा हेगडे यांनी माझ्यावर केलेले आरोप हे खोटे आणि बिनबुडाचे आहेत. धनंजय मुंडे यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला जात असून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं तक्रारदार महिलेने सांगितले आहे.
* विश्वास नांगरे – पाटलांची हकालपट्टी करा
गुरुवारी दिवसभर धनंजय मुंडे प्रकरण माध्यमात गाजत असताना विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली, या भेटीत धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र या भेटीवर भाजपा आमदार अतुळ भातखळकरांनी टीका करत पवारांसोबत चर्चा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे.